(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पश्चिम रेल्वेवर आता 350 ऐवजी 500 लोकल धावणार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
येत्या 21 तारखेपासून आता सुरु असलेल्या 350 फेऱ्यांऐवजी 500 फेऱ्या चालावल्या जातील. या अधिकच्या 150 फेऱ्यांमध्ये सकाळी गर्दीच्या तासात 30 आणि संध्याकाळी गर्दीच्या तासात 29 फेऱ्यांचा समावेश आहे.
ठाणे : मुंबई लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकलच्या 702 फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र आता पश्चिम रेल्वेने 150 अधिक फेऱ्या चालवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर आता 350 ऐवजी 500 लोकलच्या फेऱ्या धावतील. या अधिकच्या फेऱ्या 21 सप्टेंबर पासून चालवल्या जातील.
मुंबई पुन्हा रुळांवर आणायची म्हटल्यास आधी मुंबई लोकल सुरु करावी अशी मागणी झाली. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मुंबई लोकल सुरु करण्यात आली. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी यांच्यासाठी सुरु करण्यात आलेली मुंबई लोकल हळूहळू केंद्र सरकारचे कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, राष्ट्रीय बँक कर्मचारी अशा अनेक व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी देखील खुली करण्यात आली. मात्र त्याचा उलटा प्रभाव पडला आणि या लोकलमध्ये देखील गर्दी वाढू लागली. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली. याचा विचार करून पश्चिम रेल्वेने आपल्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या 21 तारखेपासून आता सुरु असलेल्या 350 फेऱ्यांऐवजी 500 फेऱ्या चालावल्या जातील. या अधिकच्या 150 फेऱ्यांमध्ये सकाळी गर्दीच्या तासात 30 आणि संध्याकाळी गर्दीच्या तासात 29 फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच या 150 फेऱ्यांमध्ये विरार स्टेशनपासून सुटणाऱ्या 37 फेऱ्या असतील, ज्यात 34 धीम्या आणि 3 जलद लोकल असतील. तर विरार स्टेशनला येणाऱ्या 37 फेऱ्या असतील, ज्यात 34 धीम्या आणि 3 जलद लोकल असतील. एकूण 74 फेऱ्या विरारपासून सुटणाऱ्या आणि विरार स्टेशनला येणाऱ्या असतील. याचप्रमाणे बोरिवली स्टेशनवरून सुटणाऱ्या 37 धीम्या लोकल असतील ज्या चर्चगेट स्टेशनला येतील. तसेच चर्चगेट स्टेशनवरून बोरीवलीसाठी 39 लोकल असतील. एकूण 76 लोकल बोरिवली स्टेशनला येतील आणि तिथून सोडल्या जातील.
आधीच मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रत्येकी 350 लोकल धावत होत्या, त्यात आता पश्चिम रेल्वेने 150 लोकल फेऱ्यांची भर घातल्याने, लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण येईल अशी आशा आहे. मात्र मध्य रेल्वेने अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. सर्वात जास्त गर्दी मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये असते. त्यामुळे आता मध्य रेल्वे यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.