आमच्या जमिनी बळकावण्यासाठी भूमाफियांचा आम्हांला मासेमारी करू न देण्याचा डाव, जुहू चौपाटीवरील कोळीबांधवांचा आरोप
महाराष्ट्र शासनाने हा संपूर्ण परिसर बंदर म्हणून यापूर्वीच घोषित केल आहे. केवळ जेट्टी बांधन बाकी आहे. लवकरच याठिकाणी जेट्टी देखील बांधण्यात येईल.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटीवर नवरात्रीतील काही दिवस मोठया प्रमाणात मासे येत असतात. हे मासे पकडण्यासाठी स्थानिक कोळीबांधव देखील येत असतात परंतु या समुद्रकिनारी आलेल्या माशांचा प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी सकाळी फिरायला येणाऱ्या उच्चभ्रू नागरिकांनी स्थानिक पोलीसांना केल्या होत्या. त्यामुळे वर्षातील केवळ पाच दिवस समुद्रकिनारी मिळणारे माशे घेण्यास सांताक्रूझ पोलिसांनी स्थानिक मासेमारी करणाऱ्या कोळीबांधवाना बंदी केली होती. तसा 10 तारखेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. परंतु कोळीबांधवांनी केलेल्या विरोधानंतर पुन्हा एकदा स्थानिक मच्छिमारांना आता पुन्हा याठिकाणी मासेमारी करण्यास परवानगी मिळाली आहे.
परंतु यातील महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक कोळीबांधवांचं म्हणणं आहे की, आमच्या जुहू मोरागाव येथील जमिनींवर भूमाफियांचं लक्ष आहे त्यामुळे ते वारंवार आम्हांला विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून करत आहेत. मुळात ही संपूर्ण जागा बंदर आणि कोळीवाडा म्हणून घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील आमची जागा बळकावण्यासाठी सध्या बिल्डर असे प्रकार करत आहेत. आणि याला आमचा प्रचंड विरोध आहे. आमचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणणं आहे की, आम्हा मराठी बांधवांवर असे दबाव आणण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर तात्काळ कारवाई करून आम्हांला न्याय द्यावा.
याबाबत बोलताना स्थानिक मासेमारी करणारे दशरथ मांगेला म्हणाले की, ज्या वेळी याठिकाणी कोणीही येत नव्हतं. नागरिकांना या परिसरात येण्याची देखील भीती वाटतं होती. त्यावेळी पासून आमचे पूर्वज याठिकाणी मासेमारी करत होते. मागील अनेक वर्षांपासून आमचे बांधव केवळ एकच व्यवसाय करत असतात. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे समुद्रचा या किनाऱ्याला एक वरदान लाभलं आहे. याठिकाणी नवरात्र उत्सवातील 5 ते 6 दिवस आपोआप मासे समुद्रकिनारी येत असतात. हेच मासे गोळा करण्यासाठी स्थानिक बांधव जात असतात. ही परंपरा गेली अनेक वर्षं सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने हा संपूर्ण परिसर बंदर म्हणून यापूर्वीच घोषित केल आहे. केवळ जेट्टी बांधन बाकी आहे. लवकरच याठिकाणी जेट्टी देखील बांधण्यात येईल. परंतु शनिवारी 10 ऑक्टोबरच्या दिवशी जुहू समुद्रकिनारी मोठया प्रमाणात मासे आले होते. हे मासे गोळा करण्याचं काम आमचे बांधव करत होते. परंतु अचानक पोलिसांनी येऊन आमच्या बांधवांना याठिकाणावरून हाकलून लावलं. यासोबतच आम्ही याठिकाणी मासेमारी करू शकत नाही. याचा त्रास याठिकाणी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना त्रास होतं आहे आणि तशा तक्रारी देखील आम्हांला येत आहेत, असं देखील सांगितलं. त्यानंतर आम्ही स्वतः सर्व बांधवांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या नंतर आम्हांला मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली. आमचा या संपूर्ण प्रकरणात आरोप आहे की, या ठिकाणी असणारे काही भूमाफिया आम्हांला वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देऊन याठिकाणी होणारी मासेमारी बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांचा आमच्या जमिनींवर डोळा आहे. आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की याकडे तात्काळ लक्ष देऊन आम्हांला न्याय द्यावा.