मुंबई : आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेल्याचा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सूरतहून सुटकेची कहाणी ऐकवली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत होते. संपूर्ण शिवसेनेत बंड करुन अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु कैलास पाटील सूरतहून आणि नितीन देशमुख गुवाहाटीवरुन परतले. 


यापैकी अनेक आमदारांना जबरदस्तीने घेऊन गेल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी वारंवार दावा केला होता. त्यानंतर आज कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपल्या सुटकेची कहाणी पत्रकार परिषदेत सांगितली. मी शिवसेनेच्या भरवशावर, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आमदार झालो. कोणत्याही आमिषाला बळी न परता, तुमच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी परत या, असं आवाहन नितीन देशमुख यांनी केलं.


शिंदेंच्या तावडीतून कैलास पाटील कसे सुटले?
यावेळी आपला अनुभव सांगताना कैलास पाटील यांनी सांगितलं की आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं. कैलास पाटील म्हणाले की, विधानपरिषदेचं मतदान झाल्यानंतर मला एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावलं. त्यानतंर तिथून आम्हाला एका ठिकाणी जायचं असं सांगून ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेलं. साहेब पुढे आहेत, आपल्याला पुढे जायचंय असं सांगितलं. मग गाडी बदलली. ठाणे मागे गेलं, पुढे जसजसं गेलो तेव्हा वेगळ काहीतरी होतंय असं वाटलं. चेतपोस्टला नाकाबंदी लागली होती. मनात पाल चुकचुकली. चुकीच्या दिशेने आपल्याला नेत असल्याचं समजलं. नाकाबंदी लागली आहे, चालत पुढे जाल का असं एकाने विचारलं. त्या संधीची फायदा घेत मी दरवाजा उघडला. गाडीतून बाहेर पडत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याला लागलो. 300 ते 400 मीटर चालल्यानंतर मला गाडीतले लोक शोधायला येणार असा विचार डोक्यात आला. त्यामुळे सुरतच्या दिशेने जो रस्ता लागतो तिथे ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. दोन ट्रकच्या मधून एक किमी चालत आलो. एका मोटरसायकलवाल्याला विनंती केली, त्याने मला गावापर्यंत सोडलं. हॉटेलजवळ मुंबईच्या दिशेने थांबलेल्या ट्रकचालकांना सोडण्याची विनंती केली. खासगी वाहनचालकांनाही विनंती केली. गाडीवरुन उतल्यावर पहिल्यांदा पक्षप्रमुखांशी संपर्क साधला. खासदारांच्या संपर्कात होता. बॅटरी डाऊन झाल्याने लाईव्ह लोकेशन शेअर करु शकत नव्हतो. यूपीच्या एक ट्रकवाल्याने विनंती मान्य करुन जिथपर्यंत जाईन तिथे सोडेन. या सगळ्यादरम्यान पाऊस सुरु होता. चालताना, मोटारसायकलवरुन जाताना भिजलो. ट्रकचालकाने मला दहिसर टोलनाक्यापर्यंत सोडलं. तिथून मला आणण्यासाठी साहेबांनी एका व्यक्तीला पाठवलं होतं. तो ट्रकचालक मला देवदूत म्हणून भेटला. ज्या शिवसेनेने मला जिल्हा परिषद सदस्य केलं, जिल्हाप्रमुख केलं, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं माझ्या तत्त्वात बसलं नाही. मला जसं घेऊन गेले तसे ग्रुप ग्रुपने नेलं असेल. असे बरेच आमदार असतील ज्यांच्या यायची इच्छा आहे, ते दबावामुळे किंवा अडचणीमुळे येऊ शकत नाही.


गनिमी काव्यने निसटलेल्या नितीन देशमुख यांची आपबिती
नितीन देशमुख यांनी सांगितलं की, "20 तारखेला विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता आमचे तत्कालीन गटनेते शिंदेसाहेबांनी आम्हाला बंगल्यावर बोलावलं. गटनेत्याचा आदेश अंतिम असतो. मी तात्काळ बंगल्यावर गेलो. आमच्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाशभाऊ होते. आम्ही गाडीत बसलो गाडी ठाण्याच्या दिशेने निघाली. आम्ही पुढे पालघरला निघाली. आमदार वनगा यांच्याकडे जात असल्याचं सांगितलं. पालघरमध्ये एका हॉटेलवर थांबलो तेव्हा तिथे शंका निर्माण झाली. चहाटपरीवाल्याला रस्ता कुठे जातो विचारलं. गुजरातला रस्ता जोत असं त्याने सांगितलं. तेवढ्यात तिथे आमचे तीन मंत्री तिथे आले. शंभूराज देसाई साहेब, संदीपान भुमरे साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब आले. त्यांची शिंदेसाहेबांसोबत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मला आणि प्रकाशभाऊंना गाडीत बसायला सांगितलं. गाडी गुजरातच्या दिशेने सरळ निघाली. प्रकाशजी थोडे घाबरले, आपण कुठे चाललो असं विचारलं. प्रकाशजींना गाडीतून उतरवलं. सत्तार आणि भुमरे आणि त्यांचे पीए यांना गाडीत घेतलं. मग त्यांचे फोन सुरु झाले. हा निघाला का, तो निघाला का, ती गाडी निघाली का अशी विचारणा सुरु झाली. माझी शंका क्लिअर झाली की, सरकारविरोधत कटकारस्थान करण्यासाठी आपल्याला गुजरातला घेऊन जात आहे. प्रकाश सुर्वे आले आणि त्यांनी कुठे जात आहोत अशी विचारणा केली. पण तू गाडीत बस पुढचा विचार करु नको असं सांगितलं. मग दुसरा आला त्याने सांगितलं कैलास गायब झाला. मला आनंद वाटला. मी साहेबांना संपर्क केला. मी सूरतहून परत येईल असं सांगितलं. मला परिस्थिती पाहायची होती. फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त दिसत होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रकाश गायब झाला, मला आणखी आनंद झाला. मी साहेबांना म्हटलं की माझी इथे राहण्याची इच्छा नाही, मला जाऊ द्या. त्यांनी टाईमपास करत पाच मिनिटांनी जा, दहा मिनिटांनी जा, असं सांगितलं. पोलिसांसोबत वाद झाला. साडेबारा वाजता हॉटेलमधून पायी निघालो पण माझ्यामागे 100 ते 150 पोलिसांचा ताफा होता. साडेबारा ते तीनच्या दरम्यान मी सुसाट पायी निघालो होतो, पाऊस सुरु होता. मोबाईलची बॅटरी डाऊन होती. सावंतसाहेबांशी संपर्क केला. नाईक साहेबांशी संपर्क केला. तुला एक गाडी घ्यायला येईल असं सांगितलं. पण माझं संभाषण पोलिसांनी ही ऐकलं. पोलिसांनी धरुन मला लाल रंगाच्या गाडीत भरुन सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. मला कोणताही आजार नाही त्यामुळे डॉक्टरांना हात लावून दिला नाही.पोलीस आणि डॉक्टरांच्या संभाषण सुरु होतं. त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरुन मला शंका निर्माण झाली. त्यानंतर डॉक्टरने मला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं. साडेसहाच्या दरम्यान २० ते २५ जणांनी मला पकडून जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. हार्ट अटॅकच्या नावाखाली माझा घातपात करणार आहे हे मला कळलं. इंजेक्शन दिल्यावर मला गुंगी आली. मला अशा ठिकाणी नेलं की एका खोलीबाहेर आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त. ज्याप्रमाणे गनिमी काव्याने महाराजांनी सुटका करुन घेतली होती. तशीच मी देखील गनिमी काव्याने माझी सुटका करुन घेत महाराष्ट्रात परतलो."


गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं : नितीन देशमुख



Kailas Patil EXCLUSIVE : Eknath Shinde यांच्या तावडीतून आमदार कैलास पाटील कसे सुटले?



Nitin Deshmukh PC : गनिमी काव्याने निसटलेला सेनेच्या दुसऱ्या आमदाराची आपबिती ABP Majha