Maharashtra Political Crisis Jayant Patil : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक 'सिल्वर ओक'मध्ये पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील दिशा ठरवण्यात आली. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकार टिकावं अशी आमची इच्छा असल्याचेही पाटील यांनी म्हटले. राज्यातील परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आज सायंकाळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकांव अशी आमची इच्छा आहे. सरकार टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याबाहेर गेलेले शिवसेना आमदार माघारी येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असल्याने त्यांना आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या असलेला प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे, मुख्यमंत्रीपद सोडले नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. सरकारी कामकाज करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी ते वर्षा बंगल्यावर आले होते. त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांसह सर्वांनी विनंती केल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर वास्तव्यास आले होते, असेही पाटील यांनी सांगितले.
मुंबईतील शिवसेना आमदारांवर विश्वास होता
आज एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे आणखी चार आमदार सामील झाले. यामध्ये सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचा समावेश आहे. शिवसेनेचे किमान मुंबईतील आमदार बाहेर जाणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे गुवाहाटीत दाखल झाल्याने आश्चर्य वाटत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. सध्या गुवाहाटीत दाखल झालेले आमदार शिंदे गटासोबत संवाद साधत असावेत, तिकडे नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज घेण्यासाठी गेले असावेत. नेमकं ठोस सांगता येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
आमदार माघारी येतील
शिवसेनेतील हा वाद निवळेल असा विश्वास व्यक्त करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहतील आणि त्यांचे आमदार झुगारणार नाहीत, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.