(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक यावर्षी सुरू होणार
मुंबई ते बेलापूर ही जलवाहतूक सुरू झाल्यास 1 तासात मुंबई ते नवी मुंबई अंतर कापले जाईल. येणाऱ्या 1 वर्षात रोरो आणि रोपॅक्स पद्धतीने नवी मुंबई प्रमाणेच मुंबईपासून काशीद, रेवस, करंजा आणि जेएनपीटी पर्यंत सुरू होईल.
मुंबई : कोरोना काळात लोकल बंद असल्याने नवी मुंबईतून मुंबईला येणाऱ्या अनेकांना रस्त्यावरच्या खड्ड्यातून मार्ग काढत अतिशय खडतर प्रवास करावा लागला होता. अजूनही सर्वांसाठी पूर्णवेळ लोकलचे दरवाजे सुरू झालेले नाहीत. मात्र लवकरच या सर्व प्रवाशांसाठी एक वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. येत्या काही महिन्यातच मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक सुरू होणार आहे. या वर्षीच मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर अशी जल वाहतूक कार्यान्वित केली जाणार आहे. येत्या 2 ते 4 मार्च दरम्यान मेरीटाईम इंडिया समिट होणार आहे. त्यात जगभरातील अनेक देश आणि कंपन्या सहभागी होतील. यावर्षी या समिटचे दुसरे वर्ष असून कोरोना मुळे व्हर्चुअल पद्धतीने ही समिट होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.
राजीव जलोटा यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जोडणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पांविषयी माहिती विचारली असता ते म्हणाले की, सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. अगदी लहान लहान काही गोष्टी शिल्लक आहेत, त्या देखील पूर्ण होतील. त्यामुळे या वर्षीच काही महिन्यानंतर आपण मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे जलमार्गाने जोडू शकू. मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर हा पहिला मार्ग आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर वाशी, नेरुळ, ऐरोली, ठाण्यातील मीठ बंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी थांबा दिला जाईल.
मुंबई ते बेलापूर ही जलवाहतूक सुरू झाल्यास 1 तासात मुंबई ते नवी मुंबई अंतर कापले जाईल. येणाऱ्या 1 वर्षात रोरो आणि रोपॅक्स पद्धतीने नवी मुंबई प्रमाणेच मुंबईपासून काशीद, रेवस, करंजा आणि जेएनपीटी पर्यंत सुरू होईल. रोरोमध्ये मोठ्या जहाजात थेट लहान वाहनांपासून मोठ्या ट्रकपर्यंत जलवाहतूक केली जाते तर रोपॅकसमध्ये प्रवासी आणि वाहनांची एकत्र जलवाहतूक करण्यात येते.
सध्या जेएनपीटी येथे रोरो जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम एक दोन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर मुंबईतील ट्रक रस्ते मार्गाने न जाता जल वाहतुकीने जेएनपीटी येथे जाऊ शकतील. या दोन्ही गोष्टीमुळे मुंबईच्या, नवी मुंबईच्या आणि ठाण्याच्या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच लोकलमध्ये होणारी गर्दी देखील काही प्रमाणात कमी होईल.