मुंबई : "वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड दुपारी दोन वाजता संपत असून आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे," अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघर हत्याकांड आणि वाधवान कुटुंबासंदर्भात माहिती दिली. तसंच मधल्या काळात काही जण लंडनला पळाले, पण आम्ही वाधवान कुटुंबाला कुठेही पळू देणार नाही, असंही गृहमंत्री म्हणाले.
अनिल देशमुख म्हणाले की, "गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं. या वाधवाना कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड आज दुपारी दोन वाजता संपत आहे. पोलीस दलातर्फे ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. आपण त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं ही विनंती केली आहे. आज दुपारी दोनपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना घेऊन जावं. जोपर्यंत सीबीआयचे अधिकारी त्यांना घेऊन जात नाहीत तोपर्यंत हे वाधवान कुटुंब आमच्याच ताब्यात राहिल. गेल्या 15 दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वॉरन्टाईन केलं आहे. दुपारी दोनची वेळ संपल्यानंतर सीबीआयने त्यांना आपल्या ताब्यात घेऊन पुढील चौकशीचं काम करावं. मधल्या काळात काही जण लंडनला पळाले, पण महाराष्ट्र सरकार वाधवान कुटुंबाला कुठेही पळू देणार नाही. ते आमच्या ताब्यात आहेत. त्यानंतर आम्ही पुढील तपासासाठी त्यांना सीबीआयच्या ताब्यात देऊ.
पोलिसांचं सीबीआयला पत्र
पोलिसांचं ईडीला पत्र
वाधवान कुटुंबाला कुठेही जाऊ देऊ नका, सीबीआयची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरपर्यंत प्रवास
बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.
कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात
वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर
लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र मिळालं. यानंतर वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश?
कपिल वाधवान
अरुणा वाधवान
वनिता वाधवान
टीना वाधवान
धीरज वाधवान
कार्तिक वाधवान
पूजा वाधवान
युविका वाधवान
अहान वाधवान
शत्रुघ्न घागा
मनोज यादव
विनीद शुक्ला
अशोक वाफेळकर
दिवाण सिंग
अमोल मंडल
लोहित फर्नांडिस
जसप्रीत सिंह अरी
जस्टीन ड्मेलो
इंद्रकांत चौधरी
प्रदीप कांबळे
एलिझाबेथ अय्यापिल्लई
रमेश शर्मा
तारकर सरकार
Wadhawan in Mahabaleshwar | लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला | ABP Majha