मुंबई : लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाच्या पर्यटन प्रकरणात सीबीआयची कोणतंही पथक दिल्लीतून महाबळेश्वर इथे दाखल झालेलं नाही किंवा मुंबईहून कोणतंही पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या सगळ्यांना चौदा दिवसांच्या सरकारी क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात यावं आणि त्यानंतरही त्यांना कुठेही जाऊ देऊ नये, असे निर्देश सीबीआयने स्थानिक प्रशासनाला आहेत.


बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर या सीबीआयचं पथक त्यांची कोठडी घेण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु सध्या तरी सीबीआयच्या पथकाला तिथे पाठवलेलं नाही. मात्र सीबीआयने साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वाधवान बंधुंवरील गुन्ह्यांची आणि अजामीनपात्र वॉरंटची माहिती दिली. तसंच कुठेही जाण्यापूर्वी किंवा कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वाधवान कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असल्याचंही सीबीआयने सांगितलं.


वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका सीबीआयला असल्याने हा निर्णय घेतला आहे. सीबीआय चौदा दिवसांच्या आत त्यांना कसं आणि कधी अटक करायची यासंदर्भात निर्णय घेणार आहे.


दरम्यान, वाधवान बंधुंचा क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर त्यांचा ताबा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसंच गरज भासल्यास सर्व आरोपींना विशेष विमानाने पाठवण्याची सोय करा असंही गृहमंत्रालय राज्य सरकारला सांगू शकतं.


कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.


स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात
वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.


विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर
लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं. त्यामुळे सामान्यांना एक नाही आणि श्रीमंत धेंडांना, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.


कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस
यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला धारेवर धरलं. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळेश्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे घडलं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरणं देणं गरजेचं आहे."


वाधवान कुटुंबीयांचा क्वॉरन्टाईन संपला की आमच्या ताब्यात द्या, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्य सरकारला सूचना : सूत्र