मुंबई : मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. आज (11 एप्रिल) सकाळी अकरा वाजता मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. यापूर्वी मागील आठवड्यात सोमवारी म्हणजेच 4 एप्रिल रोजी प्रवीण दरेकर यांची याच प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांची चौकशी होत आहे.
मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.
यापूर्वीच्या चौकशीत काय झालं?
4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता सुरु झालेली चौकशी दुपारी 3 वाजता संपली. "पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं," अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसंच पोलिसांनी अनेक वेळा उलटसुलट आणि तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय चौकशी सुरु असताना पोलीस अधिकाऱ्यांना सहा-सात वेळा फोन आले, पण कोणाचे फोन आले ते कळलं नाही, असंही दरेकर यांनी म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.
संबंधित बातम्या
- Mumbai Bank: 11 तारखेला 11 वाजता हजर व्हा; मुंबई पोलिसांची प्रवीण दरेकरांना चौकशीसाठी नोटीस
- Pravin Darekar : मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
- Mumbai Bank Scam : पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव प्रत्येक क्षणी जाणवत होतं : प्रवीण दरेकर
- Pravin Darekar : राज्य सरकारच्या दबावाखाली FIR दाखल, प्रवीण दरेकरांचा आरोप, चौकशीला पूर्ण सहकार्य करणार