Shiv Sena vs MNS : मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे (MNS)  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (रविवारी) शिवसेना (Shiv Sena)  भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण केलं. याबाबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला लगावला होता. यानंतर मनसे नेते देखील आदित्य ठाकरे विरोधात मैदानात उतरले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे. त्यामुळे आता भोंगाच्या मुद्द्यावरून शिवसेना मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे.


आमदार राजू पाटील यांचं ट्वीट :


मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट केलंय की, "मशिदीआदींवर भोंगे 'आदी' चालतात, पण हनुमान चालिसा 'आदी' चालत नाही? प्रतिक्रिया आदी' गोष्टी विचाराअंती द्या. पक्ष 'संपला' आदी म्हणताय? आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही." 



आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? 


मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेनं काल शिवसेनेला डिवचलं होतं. त्यामुळे या मुद्यावर शिवसेना आणि मनसे असा सामना सुरु झाल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळालं होतं. मनसेनं काल शिवसेनाभवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिका ऐकवली. रामनवमीचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केली. त्यानंतर पोलिसांनी भोंगा जप्त केला आणि मनसैनिकांना ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला खोचक प्रत्युत्तर दिलं. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. 


काय म्हणाले होते राज ठाकरे?


''प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला होता. 


"माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा. कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वरांशी प्रार्थना करायची असल्यास करा, मात्र घरात.", असं ते म्हणाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :