मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत ते निवडूनही आले होते. या प्रकारामुळे प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.   


प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.


मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. योगायोग म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा विधानसभेत केला होता. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.


सहकार पॅनलने उधळला विजयाचा गुलाल! मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व


प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया


सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली आहे अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र सुरु आहे. पण हाती काही लागलं नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाला बोलताना दिली. कुठल्याही परिस्थिती गुन्हा दाखल करण्यासाठी अजित पवारांवर दबाव आणल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. प्रवीण दरेकर आणि भाजपवर दबाव आणून आपल्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईला ब्रेक लावता येईल का यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा दावाही दरेकर यांनी केला.