मुंबई: मुंबै बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची 'मजूर' प्रवर्गातून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एमआरए पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे. 11 एप्रिलला सकाळी 11 वाजता हजर राहा असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. 


मुंबै बँकेच्या निवडणुकीतील 'मजूर' प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये 4 एप्रिल रोजी त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. 


काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.


महत्त्वाच्या बातम्या: