मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.


बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET ) 20 ते 30 जुलै 2020 दरम्यान घेण्यात येतील का आणि या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर करून दिनांक 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का? तसेच लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजर दिवस (deemed to be attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.


कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावे एम.फिल व पी.एचडीचा मौखिकी (vivo) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का? यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी संगितले.


विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती


राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.


सीईटी परीक्षेसंदर्भात समिती गठीत


बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असंही उद्य सामंत यांनी संगितले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला राज्यातील सर्व विद्यापीठांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या आकस्मित निधीतील काही रक्कम आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभारही उदय सामंत यांनी यावेळी मानले.

संबंधित बातम्या 




 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका