मुंबई : देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून (4 मे) सुरुवात झाली. यासोबतच ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता मद्यविक्रीला सुरुवात झाली. राज्यात काल तीन ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. या संदर्भात त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.


कांतीलाल उमाप म्हणाले की, "एरव्ही राज्यात दिवसाला 24 लाख लिटर दारुचं सेवन केलं होतं. राज्यात कालपासून मद्यविक्रीला सुरुवात झाली. तरीही काल सगळीकडे दारुची दुकानं सुरु केलेली नव्हती. अजूनही काही जिल्ह्यात विक्रीला सुरुवात झालेली नाही. राज्यात काल तीन  ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज आहे. रुपयात बोलायचं झाल्यास 10 ते 11 कोटी रुपयांची दारु विकल्याचा अंदाज आहे.


महाराष्ट्रात मद्यावरचा कर देशात सर्वाधिक
दारु खरेदीसाठी झालेली गर्दी आणि नियमांचं उल्लंघन या पार्श्वभूमीवर दिल्लीत मद्याच्या एमआरपीवर 70 टक्के विशेष कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कांतीलाल उमाप म्हणाले की, "महाराष्ट्रात मद्यावरचा कर हा देशात सगळ्यात जास्त आहे. दिल्लीने कर वाढवला तरी तो आपल्यापेक्षा कमी आहे. कर वाढवणे हा धोरणात्मक निर्णय आहे."


लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत : उत्पादन शुल्क आयुक्त
दारुची दुकानं सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची अट असतानाही अनेक ठिकाणी सगळे नियम पायदळी तुडवले होते. मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर गर्दी केली. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. त्याबाबत उत्पादन शुल्क आयुक्तांनी लोकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. "लोकांनी काळजी घ्यावी, कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं. दुकानदार आणि तिथल्या लोकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी," असं ते म्हणाले. तसंच दुकानदारांनीही काळजी आणि खबरदारी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.


- राज्यात दिवसाला 24 लाख लिटर दारुचं सेवन होतं.
- 2019-20 या आर्थिक वर्षात राज्याला दारुतून 15 हजार 428 कोटी महसूल मिळाला होता.
- वर्षाला राज्यात 86.7 कोटी लिटर दारुचं सेवन केलं जातं.
- त्यात 35 कोटी लिटर देशी दारु, 20 कोटी लिटर विदेशी दारु, 31 कोटी लिटर बिअर आणि
70 लाख लिटर वाईनचा समावेश आहे.


Lockdown 3 | पुण्यात दारु खरेदीसाठी दुसऱ्या दिवशीही लोकांच्या रांगा