Ajit Pawar : अजित पवार गटाचं ट्विटर हॅण्डल सस्पेंड, नेमकं कारण काय?
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून हे ट्विटर हॅण्डल सस्पेंड आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Camp) ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून हे ट्विटर हॅण्डल सस्पेंड आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर हॅण्डलवर दिसत आहे. शरद पवार गटाने तक्रार केल्यानंतर एक्सकडून (आधी ट्विटर) ही कारवाई करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवाय या दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाऊंट देखील वेगळे आहेत. NCPSpeaks हे राष्ट्रवादी काँग्रेसचं (शरद पवार गट) अधिकृत ट्विटर आहे. तर मागील दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचं अधिकृत ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. NCPSpeaks1 नावाने अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल होतं. नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
ट्विटर हॅण्डल आज सुरु होईल : अजित पवार गट
"याबाबत अजित पवार गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकच नावाचं अकाऊंट असल्याने शरद पवार गटाने तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटर हॅण्डल सस्पेंड झालं." दरम्यान अजित पवार गटाकडून आपलं म्हणणं ट्विटरला कळवलं असून हे ट्विटर हॅण्डल आज सुरु होईल, अशी माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आली.
आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईबाबत शरद पवार गटाकडून अर्ज
दुसरीकडे अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.