डोंबिवलीत सापांसोबत जीवघेणे टिकटॉक व्हिडीओ, वनविभागाकडून दोन सर्पमित्र ताब्यात
मागील काही दिवसांपासून त्यांनी सापांचं चुंबन घेताना असे अनेक टिकटॉक व्हिडीओ तयार केले होते. टिक टॉकच्या वेडापायी तरुणाई आपला जीव धोक्यात घालत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
![डोंबिवलीत सापांसोबत जीवघेणे टिकटॉक व्हिडीओ, वनविभागाकडून दोन सर्पमित्र ताब्यात tik tok snake kissing video viral two person detain by forest department डोंबिवलीत सापांसोबत जीवघेणे टिकटॉक व्हिडीओ, वनविभागाकडून दोन सर्पमित्र ताब्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/26203218/snake.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : टिक टॉकवरील व्हिडीयो अनेकदा वादग्रस्त ठरल्याची अनेक उदाहरणं आहेत. असाच एक कल्याणमधील व्हिडीयो समोर आला आहे. सापांसोबत जीवघेणे स्टंट करत त्याचे टिकटॉक व्हिडिओ तयार करणाऱ्या दोघांना कल्याण वनविभागानं ताब्यात घेतलं आहे. हे दोघे स्वतःसोबतच लहान-लहान मुलांनाही विषारी सापांचं चुंबन घ्यायला लावायचे.
ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही युवक हे डोंबिवलीत राहणारे आहेत. त्यांनी सर्पमित्र म्हणून स्वतःची ओळख तयार केली होती. त्यातूनच एखादा साप पकडला, की हे दोघं त्या सापांसोबत जीवघेणे स्टंट करत व्हिडीओ चित्रित करायचे.
मागील काही दिवसांपासून त्यांनी सापांचं चुंबन घेताना असे अनेक टिकटॉक व्हिडीओ तयार केले होते. हे व्हिडीओ पाहून प्राणीमित्रांनी त्यांचा शोध घेतला असता ते डोंबिवलीत राहणारे असल्याचं समोर आलं, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या चौकशीत त्यांनी अनेक विषारी सापांसोबत स्टंट केले असून अनेक लहान मुलांनाही हे जीवघेणे प्रकार करायला लावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे टिक टॉकच्या वेडापायी तरुणाई आपला जीव धोक्यात घालत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओच्या आधारे दोन युवकांवर कारवाई केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. तर दोघांपैकी एक तरुण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे मोबाईल तपासले असता त्यांना सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ अपलोड केल्याची माहिती वन अधिकारी कल्पना वाघेरे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)