आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार : सूत्र
आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं पंढरपुरात महासभा घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं.

मुंबई : आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील विठ्ठल-रुख्मिणीची महापूजा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही नेते विठ्ठलाचं दर्शन घेऊन निवडणुकांना सामोरं जाण्याची शक्यता आहे.
येत्या 12 जुलै रोजी आषाढी एकदशी आहे. मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पूजा करतात, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र यावर्षी मुख्यमंत्र्यासोबत उद्धव ठाकरे सपत्नीक आषाढी एकादशीला महापूजेला दिसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व विजयी खासदारांना घेऊन अयोध्येत गेले होते. तसेच पंढरपुरात देखील जाण्याचं उद्धव ठाकरेंचं नियोजन होतं. मात्र दिल्लीत अधिवेशन सुरु झाल्यामुळे सर्व खासदारांना घेऊन जाता आलं नव्हतं.
आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं पंढरपुरात महासभा घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं.
गेल्या वर्षी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची महापूजा करत आली नव्हती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा समाजाने दिला होता. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळणार आहे.
Before You Go
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह






















