(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला, एकनाथ शिंदेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला; खारेगाव पुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने
Thane : ठाण्यातील खारेगाव पुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ठाणे: राज्यात महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष सामिल असले तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबुऱ्या काही संपायला तयार नाहीत. ठाण्यात गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले. या पुलाच्या श्रेयवादावरुन बोलताना तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला असा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा आहे की त्यांच्या पाठपुराव्याने हा पूल पूर्ण झाला आहे. तर खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा आहे की त्यांच्या पाठपुराव्याने हा पूल पूर्ण झाला. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "या पुलाच्या निर्मितीसाठी आम्ही एकत्र काम केलं. निवडणूक अली की आव्हाड त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझं करतो. पण नंतर पुन्हा आम्ही एकत्र येतो, अगदी डावखरे असल्यापासून. जेव्हा माझ्याकडे कळवा मुंब्राचा प्रस्ताव आला त्यावेली तो मी अडवला नाही. आव्हाड साहेब तुम्ही आमचा मतदार संघ सांभाळा, आम्ही तुमचा सांभाळतो. जेव्हा ढोकलीच्या स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यायचे होते तेव्हा एका क्षणाचाही विलंब आम्ही लावला नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली आपण काम करतोय. कितीतरी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, जे गेले अनेक वर्षे प्रलंबित होते. त्यात आपण कधीही कोणताही राजकारण केलं नाही."
तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला, बाकी काही नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाण्यात या आधीही याच मुद्द्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु होता. आताही याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये या खारेगावच्या पुलाच्या श्रेयवादावरुन लढाई सुरु झाली. शिवसेनेने या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी सुरुवातीला शिवसेनेचे पोस्टर्स लावण्यात आले होते. नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या पक्षाचे पोस्टर्स लावले.
कळवा पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या खारेगाव पुलाचं आज लोकार्पण झालं. जमिनीचा वाद आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभार यामुळे 641 मीटर लांबीचा हा पूल उभारण्यास पालिकेला तब्बल 14 वर्ष लागली. या ठिकाणी पूल नसल्यामुळे कळवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडावं लागत होतं. वाहनांची संख्या वाढल्यानं फाटकाजवळ मोठी वाहतूक कोंडी व्हायची. त्यामुळे 2008 मध्ये या पुलाच्या कामासाठी पालिकेची मंजुरी मिळाली होती. मात्र, जमीन संपादनातील वाद आणि पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हे काम रखडंल होतं. अखेर 14 वर्षांनी आज या पुलाचं लोकार्पण झालं.