राज कुंद्रा व त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, शिशिर शिंदे यांची गृहमंत्र्यांनी भेटून विनंती
पॉर्न फिल्मसचे सूत्रधार राज कुंद्रा व त्याच्या टोळीतील साथीदारांना मोक्का अंतर्गत अटक करावी, अशी विनंती शिशिर शिंदे यांनी केली आहे. तसेच मुंबई पोलिसांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी पॉर्न रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक केली. राज कु्ंद्राला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. पॉर्न फिल्मसचे सूत्रधार राज कुंद्रा व त्याच्या टोळीतील साथीदारांना मोक्का अंतर्गत अटक करावी, अशी विनंती शिशिर शिंदे यांनी केली आहे. तसेच मुंबई पोलिसांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. राज कुंद्राच्या हजारो कोटींच्या संपत्तीपुढे तुम्ही व तुमचे सहकारी दबला नाहीत ही अभिमानास्पद बाब आहे, असं शिशिर शिंदे यांनी म्हटलं.
शिशिर शिंदे यांचे पत्र
शिशिर शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "अश्लील व्हिडीओ, चित्रपट व वेब सीरिज बनवून ते मोबाइल अॅप व संकेतस्थळांवर अपलोड करत राज कुंद्रा आणि त्याच्या टोळीने (गँग) कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न देशातून व परदेशातून गैरमार्गाने मिळवले.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक केदारी पवार आणि त्यांच्या पोलिस सहकाऱ्यांनी काटेकोर व कुशल तपास करीत पहिल्या धाडीतच नऊ आरोपीना रंगेहाथ पकडले. या गँगला अर्थपुरवठा करणारा व परदेशांत पॉर्न फिल्मस, पाठवून कोट्यावधींची कमाई करणारा अय्याशी सूत्रधार रिपू सुदन बालकिशन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व त्याचा सहकारी रॉयल जॉन मायकेल थॉर्प यांना सोमवारी 21 जुलै रोजी अटक करण्यात आली. अजून एक सूत्रधार फरारी आहे.
मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी येणाऱ्या तरुणींना वेबसीरिज, शॉर्ट फिल्म किंवा टीव्ही मालिकांमध्ये संधी देतो असे सांगून सदर आरोपी त्यांची फसवणूक करत खोट्या करारपत्रांवर सह्या घेत व अश्लील चित्रफित तयार करण्यासाठी प्रसंगी या तरुणींना धमकावून पॉर्न फिल्म करण्यासाठी जबरदस्ती करीत असत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना अटक
गावाकडून, परप्रांतातून आलेल्या गरीब तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन या अश्लील फिल्मस् तयार केल्या जात होत्या. शेकडो भारतीय तरुणींचे जीवन उध्वस्त करणारे हे अय्याशी सूत्रधार राज कुंद्रा व त्याचे साथीदार म्हणजे समाजातील कीड आहे. हा संघटित गुन्हेगारी कारवायांचा प्रताप आहे.
राज कुंद्राच्या हजारो कोटींच्या संपत्तीसमोर न वबलेले, आमिषाला बळी न पडलेले मिलिंद भारंबे, केदारी पवार व त्यांचे जिद्दी व कुशल सहकारी यांचे मोठेच कौतुक वाटते. अभिमान वाटतो.
माननीय गृहमंत्रीजी, शेकडो तरुणी नासवणारे, समाज नासवणारे हे गडगंज श्रीमंत आरोपी व त्यांची गँग यांची नांगी ठेचणे राज्य सरकारचे, मुंबई पोलिसांचे कर्तव्य आहे. आपण या सर्व बाबींचा व सोबत जोडलेल्या वृत्तपत्रांतील कात्रणांचा विचार करुन ही कीड ठेचण्यासाठी पॉर्न फिल्मसचे सूत्रधार राज कुंद्रा व त्याच्या टोळीतील साथीदारांना मोक्का अंतर्गत अटक करावी ही आग्रहाची विनंती."