Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीनं राजीनामा घ्या; सुप्रिया सुळे कडाडल्या, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Maratha Reservation: संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
Maratha Reservation Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (NCP (Sharad Pawar)) गटाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनही करण्यात आलं. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही (Supriya Sule) सहभागी झालेल्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे, सातत्यानं जालन्याला ज्या अमानुष पद्धतीनं महिलांवर मुलांवर अन्याय आणि लाठीचार्ज केला जात आहे. याच गृहमंत्रालयानं त्यानंतर ज्या पद्धतीनं कोयता गॅंग असेल आणि ज्या पद्धतीनं मराठा असेल धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे."
"कालपासून हेच बोलत आहेत की, काल सत्तेत असलेले जे आमदार आहेत. मंत्र्यांची कॅबिनेट झाली होती, सह्याद्रीला आणि आंदोलन सत्तेत असलेले आमदार करत होते, गव्हर्नर हाऊसला. गव्हर्नर हाऊस आणि सह्याद्रीमध्ये तुम्ही चालत जरी गेला तरी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार गव्हर्नर हाऊसला सत्तेत जातात. याचाच अर्थ आम्ही तर विरोधातच आहोत, पण सत्तेत असलेल्याही आमदारांना या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही.", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"मी गेले दोन दिवस मागणी करतेय, तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीनं अधिवेशन घ्या, ही सातत्यानं मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतल्या बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात जास्त वेळा हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे?", असंही त्या म्हणाल्यात. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, "माननीय देवेंद्रजी आमच्या घराच्याबाहेर येऊन म्हणाले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ धनगर समाजाला. काय झालं दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, ना मराठा समाजाला 30 दिवसात... आज जरांगे पाटलांचा मनाचा मोठेपणा आहे की, ते स्वतः म्हटले 30 दिवस नको, मी दहा दिवस वाढवून देतो, 40 दिवस दिलेत."
सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाला ठोकलं टाळं
सत्ताधारी आमदारही आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत कामकाज चालू न देण्याचा इशाराही सर्व आमदारांनी यावेळी दिला. आमदारांनी मंत्रालयाला टाळं ठोकलं. यावेळी पोलिसांकडून आमदारांची धरपकड करण्यात आली. काही आमदारांना ताब्यातही घेण्यात आलं.
मंत्रालयातून ताब्यात घेतलेले आमदार
राजू नवघरे
अमोल मिटकरी
राहुल पाटील
कैलास पाटिल
विक्रम काळे
चेतन तुपे
बाबासाहेब आजबे
यशवंत माने
निलेश लंके
बाळासाहेब पाटील
दिलीप बनकर
बाबाजाणी दुर्रानी
मोहन उबर्डे, शेखर निकम
राजेश पाटील, सुनील शेळके