राज्य सरकारने औषध वितरकांचे 97 कोटी थकवले, बिले तातडीने मंजूर न केल्यास हाफकिनबाहेर आंदोलनाचा इशारा
तब्बल 97 कोटींची बिले अद्यापपर्यंत हाफकिनकडून औषध वितरकांना देण्यात आलेली नाहीत. ही बिले मंजूर व्हावी यासाठी सात ते आठ महिन्यांपासून वितरकांकडून हाफकिनकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
मुंबई : राज्य सरकारने कोट्यवधींची बिले थकवल्याने औषध वितरकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीने बिले मंजूर करण्यात यावी, अन्यथा हाफकिन बाहेर आंदोलन करण्याचा इशारा औषध वितरकांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच औषध वितरक देशोधडीला लागले असताना हा आर्थिक भुर्दंड त्यांना बसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयांना आवश्यक असणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे, सर्जिकल वस्तू यांचा पुरवठा हाफकिनच्या माध्यमातून करण्यात येतो. त्यासाठी हाफकिनकडून राज्यातील सर्व रुग्णालयाकडून आलेल्या मागणीनुसार टेंडर काढून वैद्यकीय साहित्य आणि औषधे खरेदी करण्यात येतात. 2018-19 , 2019-20 या वर्षासाठी हाफकिनने राज्यातील विविध औषध वितरकांकडून तब्बल 220 कोटींची औषधे खरेदी केली होती. यातील तब्बल 97 कोटींची बिले अद्यापपर्यंत हाफकिनकडून औषध वितरकांना देण्यात आलेली नाहीत. ही बिले मंजूर व्हावी यासाठी सात ते आठ महिन्यांपासून वितरकांकडून हाफकिनकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
मात्र ही बिले मंजूर करण्यास हाफकिनकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप औषध वितरकांकडून करण्यात येत आहे. थकीत बिलांसदर्भात चौकशी करण्यासाठी जाणार्या वितरकाला हाफकिनमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालकही या प्रकरणी वेळ देत नसल्याचा आरोप औषध वितरकांकडून करण्यात येत आहे. कोरोना काळामध्येही वितरकांनी आपल्या जीवाची बाजी लावत रुग्णालयांना औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सर्जिकल साहित्यांचा सुरळीत पुरवठा केला. मात्र आता औषध वितरकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे.
कोरोना व थकीत बिलामुळे सध्या कर्मचार्यांना वेतन देण्यासही पैसे नसल्याने परिस्थिती बिकट झाली असल्याचे औषध वितरकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 7 ते 8 महिन्यांपासून थकीत असलेले 97 कोटी तातडीने सरकारने मंजूर करण्यात यावे, अशी मागणी वितरकांकडून करण्यात येत आहे. थकित बिले तातडीने मंजूर न केल्यास हाफकिनबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिला आहे.
सध्या कोरोनामुळे काही बिले थकली आहेत. ही खरी गोष्ट आहे. मात्र आम्ही रोज बिले मंजूर करत आहोत, काही बिले ऑनलाईन तर काही ऑफलाईन बिले काढण्यात येत आहेत. बिले मंजूर करण्याचे काम नियमितपणे सुरू आहे, असं खरेदी विक्री कक्ष, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. आर. एम. कुंभार यांनी म्हटलं.