ST Strike : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
गुणरत्न सदावर्तेंना अटक, चार तास मेडिकल
खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली. त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे.
काल सदावर्ते यांनी म्हटलं होतं की, कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले.
शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल
काल दुपारच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून दगडफेक, चप्पलफेक केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल
- Sharad Pawar : हंगामा कोण केला याची लाय डिटेक्टर चाचणी करा: अॅड. गुणरत्न सदावर्ते
- Sharad Pawar : गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली पाहिजेत, त्यांनीच कर्मचाऱ्यांना उकसवलं; हसन मुश्रीफांचा आरोप