मुंबई: आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱ्यांना जर चुकीचा रस्ता कोणी दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्यानंतर त्यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसल्याचं सांगत पवारांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.


शरद पवार काय म्हणाले? 
"आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीने तुमच्याभोवती अनेक सहकारी इथे पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवलं."


शरद पवार म्हणाले की, "नेता जर शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसलं. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतभेद असतात, संघर्ष असतात त्यावर टोकाची भूमिका कधीही न घेण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जात होता तो अशोभनीय आहे."


गेली 50 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला उपस्थित
शरद पवार पुढे म्हणाले की, "एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचा गेली 50 वर्षे घनिष्ठ संबंध आहे.  त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलेले नाहीत. याच वेळेला काही चुकीचा रस्ता दाखवला आणि कारण नसताना घरदार सोडून एसटी कर्मचारी बाहेर राहीला. त्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आली. या संपाचे नेतृत्व ज्यांनी केलं ते यासाठी जबाबदार आहेत."


महत्त्वाच्या बातम्या: