मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. दुपारी झालेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता पोलीस अटक करणार की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल


गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज झालेल्या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले. 


काय घडलं नेमकं? 
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गावदेवी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या घरी गेले. एसीपी पांडूरंग शिंदे यांनी बिल्डिंगखालून त्यांना कॉल केला असता सदावर्तेंनी त्यांना वरती बोलावले. त्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं. 


दरम्यान, शरद पवारांच्या घरावरील हल्ला हे तपास यंत्रणेला आलेले अपयश होते का? याची चौकशी होणार आहे. मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेृतत्वाखाली ही चौकशी  होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :