मुंबई शहरातली नालेसफाई गाळातच! वेळेत नालेसफाई पूर्ण न करणा-या कंत्राटदाराला पालिकेची कारणे दाखवा नोटीस
मुंबई शहर भागातील नालेसफाई 15 मे पर्यंत 50 टक्के पूर्ण होणं गरजेचं होतं. मात्र, वेळेत हे काम पूर्ण न झाल्यानं पालिकेनं ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून शहर भागासाठी आणखी एक कंत्राटदार नेमला आहे.

मुंबई : पावसाळा तोंडावर आला असतांना मुंबई शहरातली नालेसफाई अजून गाळातच आहे. शहर भागात वेळेत नालेसफाई पूर्ण न करणा-या कंत्राटदाराला पालिकेने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मनदीप एंटरप्रायजेस या ठेकेदारानं वेळेत काम पूर्ण न केल्यानं पालिकेनं शहर भागातील नालेसफाई करता आणखी एक कंत्राटदार नेमला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरातील नालेसफाई धीम्या गतीनं सुरू आहे.
मुंबई शहर भागातील नालेसफाई 15 मे पर्यंत 50 टक्के पूर्ण होणं गरजेचं होतं. मात्र, वेळेत हे काम पूर्ण न झाल्यानं पालिकेनं ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून शहर भागासाठी आणखी एक कंत्राटदार नेमला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून नालेसफाईची डेडलाईन नव्यानं जाहीर करण्यात आली आहे. सध्याचा कंत्राटदार 50 टक्के काम पूर्ण करेल आणि दुसर्या ठेकेदाराने 31 मे पूर्वी उर्वरित 25 टक्के काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
मुंबईत कोणत्या भागात किती नालेसफाई?
पूर्व उपनगरात 62 टक्के तर पश्चिम उपनगरात 68 टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर , मुंबई शहर भागात केवळ 40 टक्के गाळ काढला गेला आहे.
वेळेत काम पूर्ण न करणा-या कंत्राटदाराला पालिकेनं ठेका संपुष्टात आणणे, उर्वरित काम स्वत:च्या जबाबदारीवर व खर्चावर करणे, तसेच नोंदणी रद्द करणे, काळ्या यादीत टाकणे यासारख्या कारवाई का करू नयेत, याबाबत संबंधित सात दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत पण आतापर्यंत मुंबईत नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्याने यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :























