मुंबईत दुकानदारांना बोलण्यात गुंतवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एकाला बेड्या, दोघांचा शोध सुरु
मुंबईत दुकानदारांना बोलण्यात गुंतवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक केली असून दोन अल्पवयीन आरोपींचा शोध सुरु आहे.
मुंबई : दुकानदारांना बोलण्यात गुंतवून त्यांचा गल्ला किंवा किमती वस्तू चोरी करणाऱ्या एका टोळीचा नवघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एक सदस्य कुलदीप सिंह अवतार सिंह लबाना याला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यात दोन अल्पवयीन परंतु अट्टल गुन्हे करणाऱ्या मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबई उपनगरातील मुलुंड पूर्व येथील नवघर रोडला असलेल्या साहिल कोल्ड स्टोरेज आणि जनरल स्टोअरमध्ये हे तीन जण गेले होते. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हे तिघे रिक्षाने या विभागाची आणि या दुकानाची पाहणी करुन गेले होते. दुकानात फक्त एकच व्यक्ती असतो याची त्यांनी आधीच खात्री करुन घेतली होती. तिथे रिक्षा चालक असलेला कुलदीप हा रिक्षा सुरुच ठेवून उभा राहिला. तर साहिल आणि राजवीर हे दोघे दुकानात गेले. त्यातील एकाने दुकानाचा मालकाला बोलण्यात गुंतवले तर दुसऱ्याने हात चलाखीने दुकानाच्या गल्ल्याच्या शेजारी 67 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग त्यांनी चोरली आणि तिथून रिक्षाने पोबारा केला होता.
नवघर पोलीस या गॅंगचा शोध घेत होते. यात काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षाचा अर्धवट क्रमांक आणि त्यावर लिहिलेले 'मां का आशीर्वाद' वाक्यावरुन पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला आणि यातील एकाला अटक केली आहे. मात्र कल्याण, उल्हासनगर विभागात अशाप्रकारे चोऱ्या करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा पोलीस शोध घेत आहे.