Shivsena : उद्धव ठाकरेंची शिवसेना गटप्रमुखांना साद, लवकरच गटप्रमुखांचा जाहीर मेळावा घेणार
Uddhav Thackeray : मुंबईतील शिवसेना गटप्रमुख हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. आता उद्धव ठाकरे त्यांच्याशी जाहीर संवाद साधणार आहेत.
![Shivsena : उद्धव ठाकरेंची शिवसेना गटप्रमुखांना साद, लवकरच गटप्रमुखांचा जाहीर मेळावा घेणार Shivsena Uddhav Thackeray Block Leaders Gatneta melava will be held soon Mumbai News BMC Shivsena : उद्धव ठाकरेंची शिवसेना गटप्रमुखांना साद, लवकरच गटप्रमुखांचा जाहीर मेळावा घेणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/07/12102732/4-after-terrorist-attack-on-amarnath-pilgrims-shiv-sena-chief-uddhav-thackerays-big-attack-on-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एक जाहीर मेळावा घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसेना (Shivsena) गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करणार आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अशा प्रकारचा जाहीर मेळावा घेणार आहेत.
उद्धव ठाकरे घालणार गटप्रमुखांना साद
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा कणा मानल्या जाणाऱ्या गटप्रमुखांचा एक मेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने थेट गटप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद साधला जाणार आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी आपली संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. शिवसेनेतल्या या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच मेळावा असणार आहे. पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी उद्धव ठाकरे मात्र तयारीला लागल्याचं दिसून येतंय.
शिवसेनेत गटप्रमुखांचं मोठं जाळं आहे. गटप्रमुख हा घराघरात पोहोचणार दुवा मानला जातो. शिवसेनेचं काम घरोघरी पोहचवण्याचं काम हे गटप्रमुख करत असतात. एका वार्डात किमान 40 गटप्रमुख असतात. गटप्रमुखांवर उपशाखाप्रमुख काम करतात. त्यांच्यावर शाखाप्रमुखाचं नेटवर्क असतं. उद्धव ठाकरेंनी या सगळ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आहे. त्यामुळे आगामी काळात तळागाळात गळती होण्याची चिन्हं दिसत नाहीत.
नेते जरी गेले तरी कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. मुंबईतून चार आमदार आणि एक माजी नगरसेविका सोडली तर इतर सगळे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. या मेळाव्यात गटप्रमुखांवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
येत्या 5 ॲाक्टोंबरला दसरा आहे. या मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सध्या जुंपली आहे. मेळावा कोण घेणार यावर चित्र स्पष्ट झालेलं नाही. पण उद्धव ठाकरे आपणच मेळावा घेणार असल्याचं छाती ठोकून सांगत आहेत. पण अद्याप महापालिकेनं कोणालाच परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या मेळाव्याच्या आधी गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे विरोधकांवर बाण सोडतील अशी शक्यता आहे.
भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे, त्यात मनसेही हळूहळू मुंबईत ॲक्टिव्ह झालेली आहे. शिंदे गट तर आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे असा सामना रंगणार आहे. पण या सगळ्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंचा तळागाळातला शिवसैनिक मुंबईत पाय रोवून आहे. त्यामुळेच गटप्रमुखांचा मेळावा हा पक्षात चेतना आणणारा ठरेल. त्यामुळे गटप्रमुखांना आता उद्धव ठाकरे कोणतं बाळकडू देतात हे येत्या मेळाव्यातच कळेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)