पश्चिम बंगालमधले शिखंडी कोण आहेत?; ममता बॅनर्जींवर प्रचारबंदीच्या निर्णयानंतर संजय राऊत आक्रमक
पश्चिम बंगाल निवडणुकींमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर लावण्यात आलेल्या प्रचारबंदी संदर्भात बोलताना पश्चिम बंगालमधले शिखंडी कोण आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु असून लोकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच पश्चिम बंगाल निवडणुकींमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर लावण्यात आलेल्या प्रचारबंदी संदर्भात बोलताना पश्चिम बंगालमधले शिखंडी कोण आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत बोलताना या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना फडणवीस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व्यक्तीगत शत्रू नसतात. राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू. त्यामुळे विरोधी पक्षांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात निर्बंध लादण्यात आले, तर आश्चर्य वाटायला नको. काल हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत. त्यामानाने महाराष्ट्रात या गोष्टींवर खूप नियंत्रण आहे. गुढीपाडवा आहे, लोक फिरत आहेत, मार्केटला गेले आहेत, हे तुम्ही चित्र दाखवत आहात. पण ते अपरिहार्य आहे. लोकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे. लोकं शिस्त पाळत आहेत, हेसुद्धा तितकंच खरं आहे. पण सरकार आणि प्रशासन या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत."
"पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं युद्ध सुरु आहे ते नवं महाभारत आहे. जसं त्या महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाही. अगदी शिखंडीला पुढे करुन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये हे शिखंडी कोण आहेत? ज्यांना पुढे करुन हे युद्ध खेळलं किंवा लढलं जात आहे, हे पाहावं लागेल. ममता बॅनर्जी यांनी नियमभंग केला असेल तर कोणीही कायदा आणि आचारसंहितेच्या वर नाही. पण पश्चिम बंगालमध्ये फक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमभंग केला आहे का? दिल्ली तसंच देशभरातून जे नेते येत आहेत त्यांनी कोणीच नियमभंग केले नाही का? की त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले.
पंढरपूरच्या पोटनिवडणूकीच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस याच्या वक्तव्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व्यक्तीगत शत्रू नसतात. राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू. त्यामुळे विरोधी पक्षांना आमच्या शुभेच्छा आहेत. जर त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याची नवीन तारीख त्यांनी ठरवली असेल तर त्यासाठीही आमच्या शुभेच्छा आहेत."
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोरोना विरोधात 24 तास काम करत आहेत. त्यांचं कॅबिनेट काम करतंय, त्यांचं प्रशासन काम करतंय. आणि पुढली गुढी ही आरोग्यदायी आणि मोकळ्या वातावरणात उभारण्यात येईल, असा विश्वास आपण सर्वांनी व्यक्त केला पाहिजे." , असंही संजय राऊत म्हणाले.