शिवसेनेच्या नाराज रवींद्र वायकर यांचं अखेर पुनर्वसन, मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी
गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वायकर यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या इतर नाराज नेत्यांनी नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची अखेर मुख्यमंत्री कार्यालयात म्हणजेच CMO मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य समन्वयक अधिकारी असं विशेष कॅबिनेट दर्जाचं पद तयार करून नाराज रवींद्र वायकर यांचं थेट मुख्यमंत्री कार्यालयात पुनर्वसन करण्यात आलं आहे. यामुळे शिवसेनेतील इतर नाराज आमदारांसह मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नवं CMO मंत्रालय तयार होणार असल्याची चर्चा होती. त्याठिकाणी अनिल परब यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती होती. मात्र मागच्या युतीच्या सरकारमध्ये राज्य मंत्री पद भूषवलेल्या रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये डावलल्यामुळे वायकर यांनी मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कोणाची वर्णी लागणार यासाठी वायकर विरुद्ध परब असा सुप्त संघर्ष पेटला होता. पण ठाकरे परिवाराशी असलेले संबंध आणि वजन वापरुन वायकर यांनी बाजी मारली.
मात्र असं असलं तरी रवींद्र वायकर यांना मंत्रिपद न देता विशेष पदावर नियुक्त करून एकप्रकारे बोळवणच करण्यात आली आहे. तसेच या पदाच्या अधिकारांना कात्री लावून फक्त शिवसेना आमदारांची कामं आणि जिल्हा पातळीवर उभारण्यात येणाऱ्या CMO कार्यालयाशी समन्वय साधण्याचे प्रमुख कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचं कळत आहे.
रवींद्र वायकर यांच्या नियुक्तीमुळे काय फायदे?
- रवींद्र वायकर यांच्या नियुक्तीमुळे फायदे असे की, शिवसेनेच्या आमदारांच्या कामाला गती मिळेल. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही, कामं होत नाहीत अशी तक्रार करण्याचा आमदारांना वाव उरणार नाही. - मुख्यमंत्र्यांच्या कामाचं विकेंद्रीकरण झाल्याने पक्ष हिताच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल. - मुख्यमंत्री कार्यालयावर कुठलाही आरोप झाला तर त्यासाठी थेट उद्धव ठाकरेंवर ठपका ठेवता येणार नाही.
रवींद्र वायकर यांच्या नियुक्तीमुळे काय तोटे?
- रामदास कदम, दिवाकर रावते, सुनील प्रभू, दिपक केसरकर, तानाजी सावंत यांसारख्या प्रबळ दावेदारांच्या नाराजीत भर पडेल. - एकनाथ शिंदे सारख्या नेत्याच्या मागे असलेल्या आमदारांच्या मोठ्या गटाला आता प्रत्येक कामांसाठी वायकर यांच्यावर विसंबून राहावं लागेल. - मुख्यमंत्री कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या 'स्कोप ऑफ वर्क' मध्ये हस्तक्षेप झाला तर खटके उडतील. - महाविकास आघाडीतील इतर पक्षातील नेत्यांच्या महत्वाच्या फाईलींवर बारीक नजर राहील. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही नाराजी वाढू शकते.
रवींद्र वायकर यांची वर्णी का लागली?
- रवींद्र वायकर यांचा मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदापासून ते राज्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास आहे. - या दरम्यान प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. - तसेच मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवण्याचं काम वायकर यांनी केल्याची चर्चा असते. - शिवसेना भवन आणि शिवालय या दोन्ही शिवसेना कार्यालयाच्या बांधकामाची जबाबदारी वायकर यांनी पार पाडली. - गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्रीचे अत्यंत विश्वासू मानले जातात.