Sanjay Raut : ज्या राज्यात भाजपचं सरकार तिथून कोरोनानं काढता पाय घेतला : संजय राऊत
कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोरोनासोबत लढण्यात राज्य सरकारला नाहीतर, केंद्राला अपयश आल्याचंही ते म्हणाले आहेत.
मुंबई : गुजरातमधील भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याचा आरोप काल नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत बोलताना म्हणाले की, "जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले, असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कारण ही संपूर्ण कोरोना विरुद्धची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे. कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकारं करत आहेत. मला याचं आश्चर्य वाटतं, जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजप सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपचं सरकार नाही तिच राज्यं फक्त अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे, तिथे कोरोना पळून गेला. कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?"
"केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवं. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये, अशा पद्धतीने कोरोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे. हे राज्य मोठं आहे. मुंबई, पुणे, नागपूर ही मोठी शहरं आहेत. या शहरांवर संपूर्ण देशाचा भार आहे. याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे. आज जी औषधं आम्हाला हवी आहेत. लस किंवा रेमडिसीवर या गोष्टी भाजपाच्या गुजरातमधील कार्यालयात हवी तेवढी मिळत आहेत. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती औषधं घेऊ शकता. पण महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला उपलब्ध करुन दिली जात नाहीत, हा अमानुषपणा आहे." , असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "हे राष्ट्र एक आहे आणि हे राष्ट्र एक ठेवण्याचा हा मला प्रयत्न दिसत नाही. या संकटातही जे राजकारण केलं जातंय, तेही प्रशासनाला हाताशी धरुन हे निषेध करण्यासारखं आहे. याचा निषेध सर्वात आधी महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं केला पाहिजे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :