Nitesh Rane: नितेश राणेंना सुप्रीम कोर्टातही धक्का; मिलिंद नार्वेकरांचा खोचक टोला, म्हणाले...
Nitesh Rane : नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टात तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी खोचक ट्वीट केले आहे.
Shivsena Leader Milind Narvekar on Nitesh Rane Case : शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टातही धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी खोचक ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर कोणताही नामोल्लेख न करता 'लघु सुक्ष्म दिलासा' असे ट्वीट केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी आहे. त्यावरून मिलिंद नार्वेकर यांनी हे ट्वीट केले. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांनी यांच्या टीकेला आणखीच धार आली होती. त्यानंतर शिवसेना आणि राणे यांच्याकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
नारायण राणे यांचे चिरंजीव, भाजप आमदार नितेश राणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करत असतात. मागील काही वर्षांपासून नितेश राणे यांच्याकडून युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटले होते. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनासाठी बसलेल्या नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे विधीमंडळात प्रवेश करताना मांजरीचा आवाज काढला होता. या प्रकारावरून नितेश राणे यांच्यावर टीका झाली होती. विधानसभेतही याचे पडसाद उमटले होते.
लघु सुक्ष्म दिलासा!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) January 27, 2022
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टात मोठा धक्का बसला. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण मिळाले आहे.