एक्स्प्लोर
श्रीनिवास वनगांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर
पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.

पालघर : पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला असला, तरी शिवसेनेकडून 2019 लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वनगा यांनाच जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
पोटनिवडणुकीच्या वेळी श्रीनिवास वनगा, तुला 15 दिवस मिळाले होते, पण आता 8-9 महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश उद्धव ठाकरेंनी वनगा यांना दिला.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी लोकसभा स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले. आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, 2019 चा हिरो तूच, असंही उद्धव यावेळी म्हणाले. पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात आली.
'साम दाम दंड भेद वाल्या निवडणुकीत श्रीनिवास यांनी 'त्यांना' घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन एवढी मतं मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. सहा लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झालं. खिलाडूवृत्तीनं हार स्वीकारावी लागते, पण मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो, असं उद्धव म्हणाले.
जे मतदानासाठी रांग लावून उभे होते, त्यांना मशिन बंद दिसल्या. उन्हामुळे यंत्रं बंद पडत असतील, तर आधी का तपासणी केली नाही? आयोग म्हणून काय केलं? पैसे पकडले, नावं सागितली, पण काहीच केलं नाही. हेच शिवसैनिकांविरोधात घडलं असतं तर? हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांवर बंदी घेतली होती, मग पैसे वाटले म्हणून काय केलं? नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात? असे संतप्त सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. मात्र पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
