(Source: Poll of Polls)
शरद पवारांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरेंनी मानले आभार; म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवारांनी दाखवला
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पवार यांचे आभार मानले आहेत.
Andheri Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पवार यांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवारांनी दाखवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणुक लागली आणि शिवसेनेने श्रीमती ऋतुजाताईंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला. त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला मात्र न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेल आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्व. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्याने कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , विलासराव देशमुख, प्रमोद महाजन , शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी काय म्हटलं होतं...
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.