(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : 'केंद्र सरकारनं अख्खा देश उद्योगपतींना विकला', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Shiv Sena Sanjay Raut On Central govt : शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकार, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sanjay Raut on Central Govt : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारसह भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकारनं अनेक सार्वजनिक उपक्रम विकले आहेत. अख्खा देशच विकला आहे आपल्या मर्जीतील उद्योगपतींना. ते विकून जर तुमचं पोट भरलं नसेल तक अजून काय विकायचं राहिलं आहे. ही देशाची संपत्ती आपण विकली आहे. शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. तुम्ही गरीबांच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार होते. तुम्ही अनेक योजना घोषित केल्या. त्यासाठी तुम्ही देश विकला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
यशवंत जाधवांची संपत्ती विकून शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांचा मुद्दा संपूर्ण देशभर आहे. सात वर्षात केंद्र सरकारनं देश विकला.. एअर इंडिया राहिली होती, ती देखील विकली. आता देशात विकण्यासारखंही काही राहिलेलं नाही.
राऊत म्हणाले की, 2024 ची तयारी आतापासून सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही नागपूर दौऱ्यावर जाणार आहोत. नागपुरात शिवसेना वाढवणार असल्याचंही राऊत म्हणाले.
पैसे राजभवनात गेले नाहीत तर कुठे गेले, याचा हिशोब द्यावा लागणार
आयएनएस विक्रांत हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. आयएनएस विक्रांतच्या पै न पैचा हिशोब घेतला जाईल. कितीही कुणी बाहेर येऊन बडबड केली तरी फरक पडणार नाही. या संदर्भात लवकरच पोलिस कारवाई करतील. ममाझा हा हवेतील गोळीबार नाही, आम्ही पुराव्यासह बोललो आहेत. राजभवनातून आलेलं पत्र सर्वात मोठा पुरावा आहे. जर पैसे राजभवनात गेले नाहीत तर कुठे गेले. याचा हिशोब अंतरिम जामिनावर सुटलेल्या आरोपींना द्यावा लागेल. हा घोटाळा साधा नाही. लाखो लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. 58 कोटींचा हा घोटाळा आहे. हा आकडा कुठुन आणला हे पोलिस सांगतील, असंही संजय राऊत म्हणाले.