शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; फक्त आदित्य ठाकरेंना नोटीस नाही!
Shiv Sena MLA : बंड पुकारून सत्तांतर घडवणाऱ्या शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंसोबत उरलेले सेना आमदार या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे.
Shiv Sena MLA : बंड पुकारून सत्तांतर घडवणाऱ्या शिंदे गटाचे आमदार (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) उरलेले शिवसेना आमदार या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे. अपवाद फक्त आदित्य ठाकरे यांचा. दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. शिंदे गटानं आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केली नव्हती, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
53 आमदारांना सात दिवसांच्या आत विधिमंडळात उत्तर द्यावे लागणार असल्याची माहिती आहे. शिंदे गट आणि शिवसेना या दोन ही गटाच्या आमदारांनी व्हिप झुगारल्याची तक्रार केली होती. तक्रारीनंतर आमदार आदित्य ठाकरे वगळता 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा मिळाल्यात. या तक्रारी नोटिशींमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव नसल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस नाही. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीच्या वेळी शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र या व्हिपचं उल्लंघन करत मतदान केल्याने दोन्ही गटाकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या
उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्या शिवसेनेचं अस्तित्व आणि भविष्य हे अनेक अनुत्तरीत प्रश्नांवर अवलंबून आहे. सत्तांतरांनंतर बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, दोन्ही गटांनी एकमेकांचा व्हिप धुडकावून लावल्याचा परस्परविरोधी दावा केला आहे. ठाकरेंसोबत उरलेल्या गटाच्या व्हिपचं उल्लंघन झाल्याचं तत्कालीन पीठासीन अधिकार नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतलं. तर त्यानंतर काही तासांत, नवे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या व्हिपचं उल्लंघन झाल्याचं रेकॉर्डवर घेतलं. त्याआधारे विधिमंडळ सचिवांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी खल होणार आहे.
शिवसेनेतली गटनेतेपदावरची लढाई सुप्रीम कोर्टात येणार आहे. सोबतच 16 आमदारांच्या निलंबनासह एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या तक्रारीची याचिका देखील सुप्रीम कोर्टात आहे. यावर 11 तारखेला सुनावणी होणार आहे.