(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात सरकार अस्तित्वातच नाही, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही : संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut on Maharashtra Government : राज्यात सरकार अस्तित्वातच नाही, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut on Maharashtra Government : महाराष्ट्र (Maharashtra) पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेलाय, मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. तसेच, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, राज्यपाल आता कुठे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) मातोश्रीवर (Matoshree) याव्यात म्हणून पाठिंबा दिलेला नाही, आदिवासींप्रती असलेल्या भावनेपोटी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेनं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आज त्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे सकाळपासूनच द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "द्रौपदी मुर्मू यांनी मातोश्रीवर यावं म्हणून पाठिंबा दिलेला नाही. आदिवासींप्रती असलेल्या भावनेपोटी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. हिच आमची इच्छा आहे आणि आमची आदिवासी समाजाविषयीचा आदर आणि भावनेपोटी हा निर्णय आम्ही घेतला. राजकारणापलिकडे जाऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "यापूर्वी एनडीए सरकारमध्ये असतानाही आम्ही काँग्रेसच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनेची ही परंपरा आहे."
...कारण हे सरकार बेकायदेशीर : संजय राऊत
संजय राऊत यांनी बोलताना महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारवरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले. "अजून काहीच सुरू झाले नाही, राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी लोक मृत्यू पडत आहेत. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर पडलाय, राज्यपाल कुठे आहेत आता? घटनेचे पालन आता तरी राज्यपालांनी करावं, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट राज्यपालांना प्रश्न विचारला आहे. तसेच, मंत्रालय ठप्प पडले आहे. शपथ घेऊन देखील कामकाज सुरू झाले नाही. मंत्री अजून का बनले नाही?", असं संजय राऊत म्हणाले.
संसदेत काही शब्दांवर बंदी घातली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "या शब्दांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर का आली? हे सर्व शब्द भविष्यात सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात. या भीतीतून हे झालंय का? या देशातला भ्रष्टाचार संपूर्णपणे संपलाय का? विधीमंडळ, स्थानिक स्वराज्य, पालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तरी शब्द वापरायचा नाही? ही कुठली हुकूमशाही?"
महत्त्वाच्या इतर बातम्या :