Sheena Bora Murders Case : इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज सीबीआय कोर्टानं पुन्हा फेटाळला
शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हीने पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तिचा हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने जामीनासाठी दाखल केलेली याचिका पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने वैद्यकीय कारणांसठी इंद्राणीला जामीन देण्यास नकार दिला आहे. इंद्राणीची तब्येत ठणठणीत असून ती आजारी असल्याचे कोणतेही वैद्यकीय पुरावे उपलब्ध नाहीत, असे सीबीआयच्या वतीने कोर्टात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांनी इंद्राणीची जामिनासाठीची याचिका फेटाळून लावली. साल 2018 मध्येही अश्याच वैद्यकीय कारणांसाठी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जी हीची प्रकृती ठिक नसते, तिचा आजार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. तुरुंगात आजारपणामुळे आपलं काही बरं वाईट होऊ नये म्हणून इंद्राणीने काही महिन्यांपूर्वी सीबीआय कोर्टात जामीन मिळावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. सीबीआयने या अर्जाला आव्हान देत इंद्राणीला जामीन देऊ नये यासाठी जोरदार युक्तीवाद केला. न्यायालयाने सीबीआयचा हा युक्तीवाद ग्राह्य धरत इंद्राणीला दिलासा देण्यास नकार दिला आणि तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची हत्या साल 2012 मध्ये इंद्राणीने घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या कटाची संपूर्ण माहिती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही होती, असा सरकारी पक्षाचा आरोप आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर तीन वर्षांनी या प्रकरणाचे गूढ उलगडले होते. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने, तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि आपला ड्रायव्हर श्यामवर राय यांच्या साथीने शीनाची हत्या केली होती. श्यामवर रायला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती, ज्याच्या चौकशीत या हत्याकांडाची माहिती मिळाली. पुढे श्यामवर राय हा माफीचा साक्षीदार झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.