Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Sharad pawar: महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित ही वेब सीरीज भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्मचरित्रात्मक कलाकृती आहे.
Sharad pawar: मुंबई : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आषुतोष गोवारीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली. महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित 'मानवत मर्डर्स' वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मानवत मर्डर्स' या क्राइम थ्रिलर वेब सीरीजचा दमदार टीझर काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. महाराष्ट्रात घडलेल्या 1970 च्या दशकातील भयानक हत्याकांडावर आधारित मानवत मर्डर्स वेब सीरिज आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या स्टोरीटेलर्स नूक प्रोडक्शन हाऊस आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेल्या सीरीजचे दिग्दर्शक आशिष बेंडे आहेत. मात्र, या सिरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आशुतोष गोवारीकर (Ashutosh gowarikar) यांनी साकारली आहे. त्यामुळे, गोवारीकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. कारण, या वेब सिरीजमधील घटनेशी शरद पवार यांचं जुनं कनेक्शनआहे. दरम्यान, या घटनेच्या कालावधीत शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री होते.
महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित ही वेब सीरीज भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्मचरित्रात्मक कलाकृती 'फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'वर आधारित 'मानवत मर्डर्स' ही सीरीज आहे. त्यामध्ये, आशुतोष गोवारीकर हे रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका साकारत आहेत. त्यांसह, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर असे प्रतिभावान कलाकार देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'मानवत मर्डर्स' वेब सीरिजमध्ये महाराष्ट्रातील सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा होणार आहे, ज्या घटनेनं 1970 च्या दशकात देशाला हादरून टाकलं होतं. विशेष म्हणजे त्याकाळी राज्याचे गृहमंत्री शरद पवार होते. त्याच अनुषंगाने आशुतोष गोवारीकर यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीय.
'मानवत मर्डर्स' वेब सिरीजबाबत शरद पवार आणि आशुतोष गोवारीकर यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 दरम्यान परभणी जिल्ह्यात 11 महिलांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. या कालावधीत शरद पवार यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यामुळे, वेब सिरीज प्रदर्शनापूर्वी शरद पवारांची भेट घेऊन गोवारीकर यांन चर्चा केली.
शरद पवारांनी सोशल मीडियातून दिली माहिती
'मानवत मर्डर्स' या वेब सिरीजच्या निमित्ताने प्रसिद्ध सिनेअभिनेते दिग्दर्शक-निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी मुंबईच्या निवासस्थानी माझी भेट घेतली. या भेटीदरम्यान माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ नजरेसमोर आला. गृह राज्यमंत्री पदाची जबाबदारी संभाळताना महाराष्ट्र पोलीस दलाचे मनोबल खचताना पाहीले. त्यावेळी सक्षम पोलीस अधिकारी म्हणून रमाकांत कुलकर्णी यांनी बजावलेल्या भूमिकेने महाराष्ट्र पोलिसांना योग्य सन्मान मिळवून दिला. या घटनेचा उजाळा वेब सिरीजच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर होईल. आशुतोष गोवारीकर हे रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका साकरणार आहेत. त्यांना व त्यांच्या सर्व टिमला सिरीजच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
4 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार
'मानवत मर्डर्स' वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'मानवत मर्डर्स' ची मिस्ट्री सोडवण्याची जबाबदारी सीआयडी ऑफिसर रमाकांत कुलकर्णी यांच्या खांद्यावर असेल. रमाकांत कुलकर्णीची भूमिका आशुतोष गोवारिकर यांनी निभावली आहे. 4 ऑक्टोबरला 'मानवत मर्डर्स' ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर रिलीज होईल.