Sewri Court Issued Summons to Sanjay Raut : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांच्याविरोधात सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून अवमान केल्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टात हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना हे समन्स जारी करत 4 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.  


महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी घोटाळे केल्याचे आरोप सोमय्यांनी अनेकदा केले होते. त्याला उत्तर देताना मविआकडूनही सोमय्यांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची माहिती बाहरे काढण्यात आली. त्यातच संयज राऊत यांनी किरीट आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली, त्यातील 16 शौचालयं बांधण्याचं कंत्राट हे डॉ. मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्रं सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच "पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून सुमारे 100 कोटींचा हा घोटाळा आहे. मग घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे". युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.


यावर उत्तर देताना, "हे सर्व प्रतिमा मलिन करणारे आहे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे असून यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे", असा दावा करत मेधा सोमय्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राऊत यांनी केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे असून राऊत यांनी जाहीरपणे हे आरोप केले आहेत. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात खटल्याची कारवाई सुरू करावी अशी मागणी डॉ. मेधा यांनी या दाव्यातून केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


काय आहे टॉयलेट घोटाळा?


मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरु केली आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ही 18 मार्च 2021 रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे.  


संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना त्यांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला होता. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीन देखील सरकारची आहे असेही सोमय्या यांनी सांगितलं होतं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांच्याकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल