Satish Uke : माझ्याविरोधात षडयंत्राची मालिका; अॅड. सतीश उकेंचा कोर्टात युक्तिवाद
ED Arrested Adv. Satish Uke : माझ्याविरोधात षडयंत्राची मालिका असल्याचा आरोप ईडीच्या अटकेत असलेल्या अॅड. सतीश उके यांनी केला.
ED Arrested Adv. Satish Uke : माझ्याविरोधात षडयंत्राची मालिका रचली जात असून त्यानुसार अटक करण्यात आली असल्याचा युक्तिवाद अॅड. सतीश उके यांनी केला. ईडीने गुरुवारी नागपूरमधून अॅड. उके यांना अटक केली होती. त्यानंतर उके यांना आज विशेष कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली.
आमच्या घरात एके-47 घेऊन सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं. नेमकं काय सुरू आहे, याबाबत आम्हाला काहीच सांगितलं गेलं नसल्याचे उके यांनी भावूक होऊन कोर्टाला सांगितले. आपल्या विरोधात षडयंत्राची मालिका रचली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीने मला ताब्यात घेताना कोणत्या कारणाने ताब्यात घेतले हेदेखील सांगितले नसल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी अॅड. उके यांनी म्हटले की, मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्याविरोधात खटले लढलो आहे. न्या. लोया प्रकरणात माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मला धमकावण्यात आलं असल्याचा दावा उके यांनी आपल्या युक्तिवादात केला.
अॅड. उके यांनी म्हटले की, सन 2016 मध्ये न्या. लोया यांचे प्रकरण हाताळताना माझ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची मी पोलीस तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. माझ्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत हायकोर्टात दाद मागितल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आपण वकील झाल्यापासून सामाजिक कार्यात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक समजले जाणारे अॅड. सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर आज त्यांना विशेष ईडी कोर्टात हजर केले. जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर छापा मारला होता. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता अटक करण्यात आली. ईडीने अॅड. सतीश उके यांच्या भावालाही ताब्यात घेतले आहे.