मुंबई : 'उपलब्ध कागदपत्रांनुसारसमीर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते' असं म्हणत अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून समीर वानखेडेंना मोठा दिलासा दिला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं मंत्री नवाब मलिकांना (Nawab Malik) मात्र मोठा झटका मिळाला आहे.  समीर वानखेडेंना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देखील आयोगानं दिल्या आहेत. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडेंना त्रास न देण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. 


शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यातलं द्वंद्व पाहायला मिळालं.  या कलगीतुऱ्याच्या केंद्रस्थानी होती ती समीर वानखेडेंची जात. मात्र आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं समीर वानखेडेंना मोठा दिलासा दिलाय तर नवाब मलिकांना मोठा झटका मिळाला आहे.


उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडेंची जात ही अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. तसंच समीर वानखेडेंच्या जातीवर सवाल उपस्थित करत त्यांना लक्ष्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं दिलेत. त्यामुळं आता नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. तसंच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडेंचा छळ करु नये असे आदेश देखील पोलिसांना देण्यात आले आहेत. तसंच महाराष्ट्रात जात पडताळणी समितीनं एक महिन्यात अहवाल सादर करण्यास आयोगानं सांगितलं आहे.


ज्ञानदेव वानखेडेंकडून मलिकांविरोधात याचिका  


समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतंही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून वानखेडे कुटुंबियांची बदनामी सुरूच असल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी 8 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) याचिका दाखल केली आहे. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं नवाब मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करण्यात येऊ नये? यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha