Messenger RNA Covid-19 vaccine : वर्षभरापासून भारतामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्वाचं शस्त्र ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशाली कोरोना स्थितीची माहिती देण्यात आली. त्यासोबतच एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA) कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे.
भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस अंतिम टप्यात आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स (Gennova Biopharmaceutical ) यांनी विकसीत केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, असे निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.
96 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस –
वर्षभरापासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु झाले आहे. आरोग्य सचिव व्ही के पॉल म्हणाले की, देशातील 96 टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
तिसरी लाट ओसरली –
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तिसरी लाट ओसरल्याचे सांगण्यात आले आहे. आजच्या पत्रकार परिषधेत आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबतची माहिती दिली. आरोग्य सचिव म्हणाले की, देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. पण लोकांनी काळजी घ्यावी. काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पण एकूण देशातील परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्हे आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही काळजी घेणं थांबवू शकत नाही. कोरोना विषाणूबद्दल अद्याप आपल्याला सर्व माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सतर्क राहावे लागेल.
सक्रिय रुग्ण आठ लाखांपेक्षा कमी -
आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात देशात सरासरी 96 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. मागील 24 तासांत देशात 66 हजार 84 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7.9 लाख इतकी आहे. मागील चार दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णवाढ एक लाखांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. या चार राज्यात प्रत्येकी 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्णांची संख्या आहे. 11 राज्यांत दहा हजार ते 50 हजारांच्या दरम्यान सक्रिय रुग्णसंख्या आहे. केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आहे. केरळमध्ये दोन लाख 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 86,000, तामिळनाडूमध्ये 77,000 आणि कर्नाटकमध्ये 60,000 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 61 टक्के सक्रिय रुग्ण या चार राज्यातील आहेत.