Devendra Fadnavis : फडणवीसांचा उल्लेख देशाचे 'पंतप्रधान' असा, बड्या उद्योगपतीच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा
Sajjan Jindal On Devendra Fadnavis : आपण दिल्लीमध्ये जाण्यास उत्सुक नसल्याचं या आधी देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं आहे. तरीही मराठी व्यक्ती आणि पंतप्रधानपदाची चर्चा अधूनमधून सुरूच असते.

मुंबई : मराठी माणूस पंतप्रधान होणं, हा महाराष्ट्रात आजपर्यंत अनेकवेळा चर्चेत आलेला विषय. प्रत्येकवेळी वेगळ्याच कारणानं हा विषय चर्चेत येतो. या विषयाची चर्चा सुरु झाली ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या एका दाव्यामुळं. मात्र ज्यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही अशा उद्योगपतीपासून ते मंत्री आणि आमदारांपर्यंत प्रत्येकालाच वेगवेगळे साक्षात्कार व्हायला सुरुवात झाल्याचं दिसतंय.
उद्योजक सज्जन जिंदाल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख केला, मात्र आपण ओघात बोललोय असं लक्षात आल्यावर त्यांनी आपली चूक लगेचच दुरुस्त केली. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (World Hindu Economic Forum) उद्योजक सज्जन जिंदालांनी (Sajjan Jindal) केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होतंय.
Devendra Fadnavis News : फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान असा
वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी बोलताना सज्जन जिंदाल म्हणाले की, "पंतप्रधानांनी मला सांगितले की आपल्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे स्टील उत्पादन करावे लागेल. आपण चीनपेक्षा कमी नाही आहोत. आपल्याला जगासाठी उत्पादन करावे लागेल. आज मी जास्त वेळ घेणार नाही. आपण पंतप्रधानांचे ऐकण्यासाठी येथे आलो आहोत."
Sajjan Jindal On PM : भविष्यात ते खरंही होईल
आपली चूक लक्षात येताच सज्जन जिंदाल यांनी माफी मागितली आणि पंतप्रधानांच्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणत चूक दुरुस्त केली. पण ते पुढे म्हणाले की, "हे माझ्या तोंडूनही चुकीचे निघाले, पण भविष्यात ते खरेही होईल. जेव्हा माझ्या तोंडून काही बाहेर पडेल तेव्हा ती सरस्वती माझ्या जिभेवर बसलेली असते."
मात्र एका गोष्टीचा येथे योगायोग झाला असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आणि देशात सुरु झालेल्या राजकीय चर्चेची त्याला किनार आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी 19 डिसेंबरनंतर मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं भाकीत वर्तवलं होतं. नेमक्या त्याच दिवशी आयोजित वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना उद्योगपती सज्जन जिंदाल यांचा हा एक शब्द चर्चेचा विषय ठरला.
मात्र जेव्हा जेव्हा दिल्लीला जाण्याचा मुद्दा आला, तेव्हा तेव्हा फडणवीसांनी तो फेटाळूनच लावला. त्यामुळं फडणवीस सध्या तरी महाराष्ट्र सोडण्याच्या मूडमध्ये दिसत नसल्याचंच दिसून येतंय.
ही बातमी वाचा:























