Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, हल्लेखोर सराईत घरफोड्या, आधीही पोलिसांकडून अटक
Saif Ali Khan Attacked Mumbai : सैफ अली खान इमारतीच्या कितव्या मजल्यावर राहतो, त्याच्या घरी किती लोक असतात याची माहिती चोराने आधीच घेतली असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे.
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख आता पटली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरी प्रवेश केला असून त्याच्यावर या आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हा सराईत घरफोड्या असल्याची माहिती समोर येत आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने सैफ अली खानच्या घराची रेकी केल्याचीही माहिती आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या आधारे त्याची ओळखही पटली आहे. या हल्लेखोराच्या नावावर या आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केल्याचंही समोर आलं आहे.
सैफ अली खानवर करण्यात आलेला हल्ला हा केवळ चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्याला घरातील कुणी नोकराने मदत केली होती, किंवा या हल्ल्यामागचा दुसरा कोणता उद्देश होता या चर्चांना आता ब्रेक लागला आहे.
आरोपी 12 मजले पायऱ्या चढून घरात घुसला
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शेजारच्या इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने पाईप आणि फायर एस्केप पायऱ्यांच्या माध्यमातून सैफच्या घरी प्रवेश मिळवला. सहाव्या मजल्यावरील सीसीटीव्हीमध्ये या हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसतोय.
सैफवर हल्ला केल्यानंतर हा आरोपी बाहेर पडताना दुसऱ्या इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. त्यामध्ये आरोपीच्या तोंडावर काळं फडकं असल्याचं दिसतंय.
सैफच्या घराची रेकी केली होती
चोरी करण्यापूर्वी या चोराने सैफ अली खानच्या घराची संपूर्ण रेकी केल्याचं समोर आलं. इमारतीच्या मागच्या बाजूला फक्त एकच वॉचमन असतो हे त्याला माहिती होतं. तसेच इमारतीच्या 12 व्या मजल्यावर सैफ आणि करिना राहतात याचीही माहिती चोराने आधीच घेतली होती. तसेच सैफच्या घरात किती लोक असतात याची माहिती चोराला होती.
नेमकं काय घडलं?
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेमधील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. सैफच्या घरी काम करणाऱ्या एरियामा फिलिप्स उर्फ लिमा याच्या तक्रारीच्या आधारावर वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर ट्रेस पासिग, चोरीसह जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सैफच्या घरात शिरला त्यावेळी काही शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी लिमा यांनी त्याला हटकल्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला चढवला. आरडाओरड एकूण सैफ अली खान त्या ठिकाणी मदतीला आला. या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी प्रतिकार करताना आरोपीने सैफ अली खानवर हल्ला चढवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सैफ अली खानवर 6 वार
सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम खानने सैफला रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली. हात आणि पाठीवरही वार करण्यात आला आहे. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आले असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही बातमी वाचा: