MPSC साठी खुल्या प्रवर्गाच्या कमाल मर्यादेची अट रद्द करा, नवं परिपत्रक मागे घ्या : रोहित पवार
MPSC परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट रद्द करा आणि एसईबीसीचा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, अशा आशयाचं एमपीएससीने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मुंबई : एमपीएससी परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट रद्द करा आणि एसईबीसीचा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचं एमपीएससीने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वी परीक्षेत यूपीएससीसारखा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील. ओबीसी प्रवर्गातील नऊ तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.
परंतु एमपीएससीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आधीच वयाची अट असल्याने कमाल संधीची अट घालण्याची गरज नाही. ही अट घातल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे.
MPSC परीक्षेसाठी खुल्या वर्गासाठीची कमाल मर्यादेची अट रद्द करावी आणि SEBC चा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा EWC यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचं MPSC ने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी विनंती @AjitPawarSpeaks दादांना केली. याबाबत त्यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. pic.twitter.com/Oksy57Odfs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
दुसरा मुद्दा मराठा आरक्षणामुळे उपस्थित झाला आहे. एमपीएससीने 4 जानेवारीला परिपत्रक काढून यात विद्यार्थ्यांना एक पर्याय दिला आहे, ज्यात एसईबीसीचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, असं म्हटलं आहे. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या परिपत्रकामुळे खुल्या प्रवर्गातील तसंच मराठा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून त्याच्या भविष्यातील संधी हिरावल्या जातील, अशी भीती व्यक्त करत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. आता अजित पवार यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.