पालघरमध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी
बोईसर पालघर या मार्गावरून मुख्यमंत्री प्रवास करणार असल्याने आज पहाटेपासून पालघरमध्ये पाऊस सुरू असताना देखील भर पावसात या महामार्गाच्या डागडुजीचा काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं आहे.
पालघर : जिल्ह्यात सध्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असून उद्या जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोईसर पालघर मार्गावरून प्रवास करणार आहेत. त्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम भर पावसात आज सुरू करण्यात आले. त्यामुळे कधी नव्हे त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आली.
जिल्ह्यात डहाणू जव्हार नाशिक,मनोर वाडा भिवंडी तसेच ग्रामीण भागात महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. बोईसर पालघर रस्त्यावरून ही मोठी रहदारी असून या मार्गाची मागील अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था होती. या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या रस्त्यांची दुरवस्था काही सुधारलेली येथील स्थानिकांना पाहायला मिळत नाही. मात्र उद्या पालघर जिल्हा मुख्यालयाचा उद्घाटन समारंभ असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील 10 बडे मंत्री या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
हे मंत्री बोईसर पालघर या मार्गावरून प्रवास करणार असल्याने आज पहाटेपासून पालघरमध्ये पाऊस सुरू असताना देखील भर पावसात या महामार्गाच्या डागडुजीचा काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून जिल्ह्यात रोज मंत्री यावे आणि रोज आमचे रस्ते तयार व्हावे अशी अपेक्षा पालघर मधील जनता सध्या करत आहे.
जिल्ह्यात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो. मात्र असे असताना देखील या रस्त्यांची दुरावस्था फारशी सुधारलेली येथील नागरिकांना पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोन विभाग या भागाच्या मुख्य अभियंता यांचे ठाणे येथे कार्यालय आहे. मात्र या अभियंत्यांना पालघर करांची रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारी हेळसांड दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथील म्हणून का होईना पण पालघर बोईसर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालक यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.