मुंबई: रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयात एक फोन करुन अंबानी परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance) सर एचएन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. हे हॉस्पिटल बॉंबने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली. या प्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी घेतली असून त्यांचा तपास सुरू आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर रिलायन्स हॉस्पिटल (Reliance Hospital) आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या ठिकाणी पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे.
रिलायन्सकडून स्पष्टीकरण
या प्रकरणी रिलायन्सच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आज दुपारी 12.57 वाजता अशा प्रकारची धमकी आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
या आधीही जीवे मारण्याची धमकी
रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी या आधीही देण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याची तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी धमकीचा फोन करणाऱ्या बिष्णू विदू भौमिक (वय 56) या आरोपीला अटक केली होती. त्या आरोपीचे दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान असून तो मूळचा त्रिपुरामधील असल्याचं समोर आलं होतं. हा धमकीचा फोन करण्यामागे आरोपीचा काय हेतू होता याचा खुलासा मात्र त्यावेळी करण्यात आला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या :