Adani and Ambani No Poaching Agreement : रिलायन्स आणि अदानी (Adani and Ambani ) या देशातील दोन सर्वात कंपन्या. या कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स या देशातील मोठ्या व्यावसायिक समूहांनी एक करार केला आहे. या करारांतर्गत त्यांच्या रिलायन्स आणि अदानी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकमेकांसोबत नोकऱ्या मिळणार नाहीत. 'नो पोचिंग करार' असे या कराराचे नाव आहे.
बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, हा करार यावर्षी मे महिन्यात आणण्यात आला असून तो या दोन्ही समूहातील सर्व व्यवसायांना लागू होईल. अदानी आणि अंबानी हे देशातील सर्वात मोठे उद्योजक. देशातच नाही तर जगभरात दोघांचाही ठसा आहे. दोन्ही गटांमधील स्पर्धा स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे अदानी समूहाचा व्यवसाय झपाट्याने वाढत असताना रिलायन्स समूहाचे नाव आधीच मोठे आहे.
दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा
'नो पोचिंग करार' या दोन समूहामधील कराराची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा अदानी समूहाने गेल्या वर्षी पेट्रोकेमिकल्समध्ये प्रवेश केला आहे. रिलायन्सचा पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात आधीपासूनच व्यवसाय आहे, परंतु अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडनेही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. पेट्रोकेमिकल्सशिवाय 5G स्पेक्ट्रमवरून दोन अब्जाधीश कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. अदानीने हाय-स्पीड डेटा क्षेत्रात 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. तर या व्यवसायात रिलायन्स आधीपासूनच आहे.
करार अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवसायांना लागू
मुकेश अंबानींच्या विविध कंपन्यांमध्ये 3 लाख 80 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, तर अदानींच्या कंपन्यांमध्ये 23 हजार कर्मचारी काम करत आहेत. मे महिन्यापासून लागू झालेल्या या करारानंतर आता या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी एकमेकांसोबत काम करू शकणार नाहीत. नो पोचिंग करारानुसार दोन्ही कंपन्या यापुढे एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीत कामावर ठेवू शकणार नाहीत. हा करार अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप या दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवसायांना लागू असेल. म्हणजेच आता रिलायन्स ग्रुपच्या कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अदानी ग्रुपमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत आणि अदानी ग्रुपच्या कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्स ग्रुपच्या कोणत्याही कंपनीमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत.
काय आहे 'नो पोचिंग अॅग्रीमेंट' ( What is no poaching agreement)
'नो पोचिंग अॅग्रीमेंट' भारतात नवीन नाही तर आधीपासूनच सुरु आहे. याचे मुख्य कारण असे मानले जाते की स्कील असलेल्या आणि चांगल्या कर्मचाऱ्यांची कमतरता वाढत आहे. यासाठी कंपन्यांना अधिक पगार आणि भत्ते द्यावे लागतात. त्यामुळे टॅलेंटवर केलेल्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त वेळ फायदा व्हावा, अशी कंपन्यांची इच्छा आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात 'नो पोचिंग करार' बेकायदेशीर नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Gautam Adani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर, पण...