Andheri East Bypoll Election: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) आता शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सरळ सामना होणार आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीत शिवसेनेला (Congress Support Shivsena) पाठिंबा दिला आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) याआधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध भाजप-शिंदे गट अशी होणार आहे.


नाना पटोले यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांध भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक जनहिताचे निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकट काळात  देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले असल्याचे पटोले यांनी म्हटले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून  6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मुराजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.  शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे सगळ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनोधैर्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.


काँग्रेसला शिवसेनेने दिला होता पाठिंबा 


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यावेळी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. 


या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला. जयश्री जाधव यांना 96226 मते तर, भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना 77426 मते मिळाली होती.