मुंबई: देशातल्या सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्सचे (Reliance) वारसदार कोण असतील याचे अप्रत्यक्ष संकेत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दिले आहेत. गेल्या 45 वर्षांपासून मुकेश अंबानी हे रिलायन्स उद्योग समूहाशी संबंधित आहेत, तर या ग्रुपचे ते दोन दशकांहून जास्त काळ प्रमुख राहिले आहेत. आता याच रिलायन्सचे तीन वारसदार असतील असं अप्रत्यक्षपणे सूचवलं आहे. 


धीरुभाई अंबानींनी 2005 साली रिलायन्स ग्रुपमधील कंपन्यांचं विभाजन मुकेश अनिल अंबानी यांच्यात केलं. यानंतर अनिल अंबानी यांच्याकडील कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. पण तेच मुकेश अंबानी यांनी जिओसारख्या नव्या कंपन्यांची स्थापना केली, ती वाढवली देखील. आता रिलायन्स ग्रुपच्या महत्त्वाच्या कंपन्यांची कमान आता युवा नेतृत्त्वाकडे असणार आहे. आकाश अंबानी यांच्याकडे जिओची जबाबदारी, ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेलची तर अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्स एनर्जीची जबाबदारी असणार आहे. 


अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत यांच्याकडे रिलायन्स एनर्जीची जबाबदारी आहे. या कंपनीमध्ये येत्या काही वर्षांमध्ये 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी हे रिलायन्स जिओच्या चेअरमनपदावरुन पायउतार झाले असून त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. 


रिलायन्सच्या 45 व्या बैठकीला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, "आमची पुढची पीढी अत्यंत आत्मविश्वासपूर्व व्यवसायात उतरत आहे. आकाश आणि इशा हे या आधीच जिओ आणि रिटेलमध्ये काम सुरू केलं आहे. तर अंनंत आता आमच्या उर्जा व्यवसायात आत्मविश्वासाने उतरला आहे. तो त्याचा बहुतांश वेळ हा जामनगरच्या प्रकल्पाच्या कामामध्ये घालवतो. रिलायन्सच्या संस्थापकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे तीघेही झोकून देऊन काम करतील."


तीनही मुलांचं शिक्षण परदेशात 


आकाश अंबानी यांचं शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं. त्यानंतर अमेरिकेच्या ब्राऊन युनिवर्सिटीतून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तर ईशा अंबानी यांचं येल आणि स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण पुर्ण झालं. ईशा अंबानी यांनी 2015 साली व्यवसायात पदार्पण केलं. सुरुवातीला त्या जिओ प्लॅटफॉर्म्स, जियो लिमिटेड, रिलायन्स रिटेल वेंचरच्या बोर्डावर होत्या. 2018 साली त्यांचा अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत विवाह झाला. 


मुकेश अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी यांचं अमेरिकेतील ब्राऊन युनिवर्सिटीतून शिक्षण पूर्ण झालं. नंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली. रिलायन्स न्यू एनर्जी, रिलायन्स न्यू सोलार आणि जिओ प्लॅटफॉर्मवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 


रिलायन्स ग्रुपचे तब्बल 500 हून अधिक ब्रँड्स आहेत. धिरुभाई अंबानींनी सुरु केलेल्या रिलायन्स या एका कंपनीचा आता रिलायन्स समूह झाला आहे. त्यात आता नवे युवा शिलेदार रिलायन्सची ही कमान कशी संभाळणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता त्यांच्या कारकीर्दीत रिलायन्स समुहाची वाटचाल कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.