Maharashtra Politics Dasara Melava: शिवसेनेत झालेल्या फूटीनंतर आज दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडत आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शिंदे गटात शिवसेनेचे (Shivsena) दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumhane) यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत सहा खासदार असून 15 आमदार आहेत. त्यामुळे बीकेसीत कोणते खासदार, आमदार प्रवेश करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर, आता शिवसेनेत निष्ठावंत राहिले असून शिंदे गटाकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. 


शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी नागपूरमध्ये हा मोठा दावा केला. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कृपाल तुमाने यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना हा दावा केला. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आधीच शिंदे गटात सामिल झाले आहेत. बााळासाहेबांचा विचार घेऊन जाणारी शिवसेना आमचीच असल्याचा दावा तुमाने यांनी केला. आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणाऱ्या मेळाव्यात मुंबईतील आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एक खासदार शिंदे गटात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण?


उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदारांमध्ये गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम), संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), राजन विचारे (ठाणे) यांचा समावेश आहे. तर, दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर या शिवसेनेत असल्या तरी तांत्रिक कारणास्तव त्यांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. 


आमदारांमध्ये आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रविंद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनिल राऊत, रमेश कोरगावंकर, अजय चौधरी, राजन साळवी यांचा समावेश आहे.  


शिंदे गटात कोण प्रवेश करणार?


शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींचा ओघ बंद झाल्याचे चित्र आहे. मात्र, खासदार तुमाने यांच्या दाव्यानंतर काही नावांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तुमाने यांच्या दाव्यानुसार, एक खासदार मुंबई आणि मराठवाड्यातील आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी खासदार आणि शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर याला उपनेते पदी नियुक्त केले. खासदार किर्तीकर यांनी मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी असे वक्तव्य केले होते. मराठवाड्यातील खासदारांपैकी ओमराजराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे. त्यांनी 'मातोश्री'वर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला होता. परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेचे मराठवाड्यातील दुसरे खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गटात गजानन किर्तीकर आणि संजय जाधव हे शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. गजानन किर्तीकर हे शिवसेना कार्यकारणीवरदेखील आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास निवडणूक आयोगासमोरील लढाईत शिंदे गटाला बळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जाणकरांच्या मते खासदार किर्तीकर, जाधव हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. हे दोन्ही खासदार पक्षासोबत राहणार असल्याचे सध्या तरी चित्र असल्याचे जाणकरांनी म्हटले.


शिवसेनेतून शिंदे गटात कोणते पाच आमदार प्रवेश करणार याबाबत तर्क लढवले जात आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनी पक्षातील फुटीविरोधात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे कोणते आमदार प्रवेश करतील याकडे अनेकांचे लक्ष आहे. 


शिंदे गटाचा दावा शिवसेनेने खोडला


शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिष कायंदे यांनी म्हटले की, शिवसैनिक कुठेही गेला नाही. ज्येष्ठ शिवसैनिकदेखील पक्षात असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात इनकमिंग सुरू असून नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. शिंदे गटाचा दावा फोल ठरणार असल्याचे कायंदे यांनी सांगितले.